पुणे : स्नेहालय विश्वस्त संस्था आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेले “मोफत मार्गदर्शन केंद्र” हे अगदी योग्य वेळी सुरु करण्यात आले आहे, सध्या समाजात खूप अस्वस्थता आहे आणि अश्या वेळी कुटुंब व्यवस्था आणि मानसिक आरोग्य जपणे हे खूप महत्वाचे आहे असे भाजपा चे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले.
त्यांच्या हस्ते जागतिक महिला दिन आणि सौ. मंजुश्री खर्डेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत मानसिक आरोग्यासंबंधी मार्गदर्शन, वैयक्तिक व कुटुंब समुपदेशन,विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशन, व्यसनमुक्ती, रस्त्यावरील स्क्रीझोफ्रेनिक मनोरुग्ण व्यक्तींसाठी मार्गदर्शन समुपदेशनासाठीच्या केंद्राच्या उदघाट्न करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
दर गुरुवारी सकाळी 11 ते 4 कर्वेनगर येथील रमांबिका मंदिराजवळील शक्ती 98 चौकातील “दिव्यांग आधार केंद्र” येथे सौ. ज्योती एकबोटे ह्या मोफत मार्गदर्शन व समुपदेशन करणार असल्याचे मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत, त्यांना आपल्या भावना कुठे व्यक्त कराव्यात हे समजत नाही, त्यांच्या मानसिक कोंडमाऱ्यावर ह्या केंद्रात नक्कीच उपाय सापडेल असा विश्वास देखील सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केला.
याठिकाणी समुपदेशनासाठी येणाऱ्या सर्वांची माहिती गुप्त राखण्यात येते व त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या सोडविल्या जातात असे ह्या केंद्राच्या संचालिका सौ. ज्योती एकबोटे यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपा चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर,नगरसेवक जयंत भावे,प्रभाग अध्यक्ष एड. प्राची बगाटे,सौ.श्रीजा ठाकूर,गौरीताई करंजकर, सौ. कल्याणी खर्डेकर,डॉ. हिमांशू परांजपे, डॉ. कांचन परांजपे इ मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित महिलांना डॉ.कांचन परांजपे यांनी तयार केलेली ऑरगॅनिक सौंदर्य प्रसाधने भेट देण्यात आली.