विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षक व पालक यांचे महत्व………श्रीम.- ज्योती भिमा ननवरे (हडपसर पुणे)
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यास शाळेतील वातावरण शिक्षकांनी आनंददायी ठेवणे आवश्यक आहे. आनंददायी वातावरणात केलेल्या अध्यापनामुळे मुलांमधील मरगळ निघून जाते, त्यामुळे विद्यार्थी तन आणि मनाने वर्गातच असतात व काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकतात व समजून घेतात. शिक्षकांना वाटते आपल्या वर्गातील सर्वच विद्यार्थी हुशार असावेत ,म्हणून सतत एकाच पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न सुरु असतो परंतु विद्यार्थ्यांची मानसिकता जाणून मध्येच मोकळिका किंवा इतर अध्यापनाची पद्धत वापरावी.
विद्यार्थ्यांवर सतत सातत्याने गृहपाठ, पाठांतर, लेखन, इ. भडीमार करू नये. प्रत्येक विद्यार्थ्यांचा कल, कौशल्य ओळखून मार्गदर्शन केल्यास तो विद्यार्थी त्याच्या जीवनात यशस्वी होण्यास मदत मिळते विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या खेळातून,उपक्रमातून अभ्यासाचे,शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे.
विद्या ददाति विनयं विनयाद यति पात्रताम्।
पात्रत्वात् धनमान्योति, धनात् धर्म तनः सुखम ॥ विद्या विनय देते विनयामुळे पात्रता येते, पात्रतेमुळे धन मिळते, धनातून धर्म आणि मग सुख मिळते.विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ अभ्यासात प्रगती पुरेशी नसते तर त्याच्या बौद्धिक, शारीरिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक अंगांचा संतुलित विकास आवश्यक असतो.बौद्धिक विकास घडवून आणण्यासाठी नियमित अभ्यासाची विद्यार्थ्यांना सवय लावणे आवश्यक त्यामुळे त्यांच्यामध्ये विचारशक्ती, तर्कशक्ती व समस्या सोडवण्याची क्षमता निर्माण होते. वाचनाची सवय लागल्याने ज्ञानाच्या कक्षा विस्तारीत होतात.
शारीरिक विकास घडवून आणण्यासाठी नियमित व्यायाम व खेळ, संतुलित आहार व स्वच्छता स्वच्छता अत्यंत महत्त्वाचे आहे.
आज काल विद्यार्थी योग्य आहारापासून दूर होत चालला आहे , म्हणजे दैनंदिन आहारात फक्त आवडीचे पदार्थ खाल्यानंतर पालक सुद्धा आपल्या पाल्याला काय आवडते तेच डब्यात भरून देतात कारण असते, “ते दिले तर तो खातो.” असे लाड पुरावायला सोपे वाटते, परंतु मुलांच्या आरोग्याचा बेरेच पालक विचार करत नाही असे न करता आपण संतुलित आहाराचे महत्त्व मुलांना समजावून सांगितले पाहिजे.
योग्य आहार घेतल्याने मुलांना त्यातून पोषक घटक मिळतील व त्यांचे आरोग्य चांगले राहील पर्यायाने बौद्धिक, शारीरिक विकास चांगला होईल. बौद्धिक, शारीरिक विकास योग्य पद्धतीने होत राहिला तर आपोआप मुलांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे तो तणाव व्यवस्थापन करू शकतो. यातूनच भावनिक विकास घडतो.
भावनिक विकास घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा-सकारात्मक दृष्टीकोन असणे खूप महत्त्वाचे असते.
सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी शाळेतील व विद्यार्थ्यांच्या घरातील वातावरण अनुकूल असणे गरजेचे असते. आपण समाजात पाहतो स्त्री-पुरुष दोघेही नोकरी करतात, कामासाठी बाहेर जातात. परंतु ऑफिसच्या अधिकच्या कामाचा ताण आल्यास घरात चिडचिड होणे, वादविवार होणे याचा मुलांवर वाईट परिणाम होतो.
मला एक उदाहरण सांगावेसे वाटते ,”एकदा एक छोटा ८-९ वर्षाचा मुलगा मंदिरात जावून म्हणाला, ” देवा, मला आजी, आई पप्पा कोणीच नको.” मला कोणीतरी येऊन सांगितले एक छोटा मुलगा देवाजवळ अशी प्रार्थना करत होता आम्ही त्याला विचारले तू असे का बोलला तो म्हणाला, “ते सारखेच भांडत असतात,” मी त्याला बोलावले व समजून सांगितले. पहा याचा लहान मुलांवर किती परिणाम होतो म्हणून घरात वातावरण अनुकूल असावे. समाजात इतरांसोबत सहकार्याने वागणे टीमवर्क व नेतृत्वगुण जोपासले पाहिजे, विद्यार्थ्यांमधील संवाद कौशल्य वाढवले पाहिजे. सर्वांगीण विकासात नैतिक विकास व चारित्र्य विकास करणे महत्वाचे आहे.
म्हणतात ना,”नैतिकतेची वाटचाल, सत्याचा धर घट्ट हात..
खोटेपणाला दे दूर लाथ, प्रामाणिकपणाचं घर मनात बांध”
प्रामाणिकपणा, मानवी मूल्यावर आधारित विद्यार्थ्यांना गोष्टी सांगणे, उदाहरणे, प्रसंग सांगणे.जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे. नियम, शिस्त पालनाचे महत्त्व जाणून देणे आवश्यक आहे. यातूनच मानवी मूल्याचे पालन व देशप्रेम होते.
अशाप्रकारे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आणण्यास प्रयत्न केले तर निश्चितच लाभदायक ठरेल. परंतु यात केवळ शिक्षक नाहीतर पालकांचा ही महत्त्वाचा वाटा आहे. पालकांनाही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासात वेग आणण्यासाठी फक्त खान-पान नाही तर इतर गोष्टींचे महत्व जाणून घ्यावे. असे लक्ष दिल्यास खरोखर आपला पाल्य चांगल्या, योग्य दिशेने वाटचाल करेल व देशाचा एक यशस्वी नागरिक होईल.
–श्रीम.- ज्योती भिमा ननवरे (सौ. ज्योती धोत्रे. )
शिक्षिका- मनपा विद्यानिकेतन क्रमांक 4,हडपसर, पुणे