पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन २०२५ च्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी मा.नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी शिक्षकांच्या योगदानाबद्दल वरील गौरवोद्गार काढले.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील १० व खाजगी शाळा मधील ५ आदर्श शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले. आदर्श शिक्षक वितरण पुरस्कार्थीना यावेळी मानपत्र, सन्मानचिन्ह, तसेच टॅब देऊन गौरविण्यात आले.
बालगंधर्व रंग मंदिरात दिनांक ०९/०९/२०२५ रोजी झालेल्या या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी मा. नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी शिक्षक, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. राज्यात पुणे महानगरपालिका शिक्षणासाठी,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक प्रगतीसाठी अविरत झटणारी महानगरपालिका म्हणून गणली जाते असे त्यांनी म्हटले.विद्यार्थ्यांना ई लर्निंग च्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. तसेच विविध स्पर्धा परीक्षांना मुलांना बसविले जाते व त्यातूनच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख उंचाविण्याचा शिक्षकांचा सतत प्रयत्न चालू असतो. समाजात विद्यार्थी चांगल्या प्रकारे उभा रहावा हे शिक्षकाचे मुख्य उदिष्टय असते. शिक्षणात कौशल्याधिष्टीत ज्ञान गरजेचे असते. शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करीत असताना त्यांच्या शालेय जीवनातील गुरुकुल पद्धतीच्या शाळेतील स्वावलंबी शिक्षणाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुढील वर्षभरात ७५ मॉडेल स्कूल तयार करण्याबाबतचे सुतोवाच यावेळी त्यांनी केले. तसेच पुढील तीन वर्षात सर्व शाळा मॉडेल करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. शिक्षकांना शिकविण्याशिवाय झ्तरही बरीच कामे करावी लागतात, ती कमी करण्याचा प्रयत्न करु असे त्यांनी म्हटले. शिक्षकांनी स्वतः व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लावावी . त्यासाठी पुणे मनपाच्या वतीने पुस्तक मेळावा आयोजित केला जाईल असे सांगितले. मराठी संस्कृती व मराठी भाषा खूप उच्च दर्जाची असून ती विद्यार्थांपर्यंत पोहचविण्याचा सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी गुरुजनांचा योग्य सन्मान व्हावा असे सांगितले.
प्रास्ताविक शिक्षण विभागाचे उपायुक्त माननीय विजय थोरात यांनी केले .शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास महापालिका बांधिल राहील.तसेच समाविष्ट गावातील व इतर सर्व शाळांना भौतिक सुविधा पुरविण्याचे धोरण महापालिकेचे राहील असे त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व ३००० शिक्षक आमच्या दृष्टीने आदर्श आहेत असे गौरवउद्गार आपल्या प्रास्ताविकात काढले. शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे यांनी गुरु शिष्य परंपरा या शिक्षक दिनाच्या निमित्ताने जपली जाते असे म्हटले. मुलांमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण करणारे शिक्षक हवेत असे यावेळी सांगितले.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका रेखा कामथे (रेखा एकनाथ भालघरे) यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभाग पुणे महानगरपालिकेमार्फत करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व योजनांचा नामोल्लेख केला. आपण आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्यातून आपली शाळा व आपले पुणे शहर निश्चितच स्मार्ट बनवून दाखवू असे सर्व शिक्षकांच्या वतीने सांगितले. व आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांचा यथोचित सन्मान केल्याबद्दल, शिक्षकांना प्रोत्साहन दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे आभारही व्यक्त केले.
याप्रसंगी माननीय एम जे प्रदीप चंद्रन (भाप्रसे )अतिरिक्त महापालिका आयुक्त ( ज) .तसेच पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा उबाळे उपस्थित होते. उपप्रशासकीय अधिकारी श्रीमती शुभांगी चव्हाण यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. सदर कार्यक्रमासाठी आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक व त्यांचे नातेवाईक, पुणे शहरातील शिक्षक व शिक्षण विभागातील सर्व अधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.























