बाणेर : परतीच्या जोरदार पावसामुळे बाणेर बालेवाडी पाषाण परिसरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यावरील सुमारे एक ते दीड फूट पाणी साठल्याने वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झाली होती.
बाणेर मधील बाटा शोरूम जवळील मुख्य रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी साठल्याने या परिसरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तर सुस रोडवरील दत्त मंदिराजवळ राम नदीवरील पुलावर पाणी साठल्यामुळे एक बाजूचा रस्ता बंद करून वाहने सोडण्यात येत होती. सुस रोड परिसरातील शिवशक्ती चौक येथील ओढ्यावरील पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.
बाणेर परिसरातील मुख्य रस्त्यांवरील ताम्हाणे चौक, शिवनेरी पार्क परिसरात पावसाचे पाणी साठल्यामुळे वाहन चालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत होते. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे अनेक वाहने बंद पडत होती. पावसामुळे वाहतूक बाणेर परिसरातील मुख्य चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
पावसाळी गटारांच्या स्वच्छता योग्य पद्धतीने न झाल्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांनी आपल्या समस्या औंध क्षेत्रीय कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवाव्यात असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
























