पुणे ता.१९ (प्रतिनिधी) :भाजपा पूर्वीचा राहिला नाही, ही खंत भाजपाची पायाभरणी करणाऱ्या दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी वेळोवेळी व्यक्त केली होती. गोपीनाथ पडळकरांसारख्या शिवराळ आणि नवभाजप नेते महाराष्ट्रातील राजकीय आणि समाजिक संस्कृती रसातळाला नेण्याचे काम करत आहेत. राहुल गांधीनी काल मतचोरी कशा पद्धतीने केली जाते हे पुराव्यासह पटवून दिल्यानंतर पडळकरांचे आलेलं वक्तव्य म्हणजे राहुल गांधीच्या आरोपावरून लक्ष विचलित करण्यासाठी मुद्दाम केलेले वक्तव्य असू शकते अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ता सुनील माने यांनी केली आहे.
याबाबत ते म्हणाले, गोपीचंद पडळकर हे नेहमी वादग्रस्त आणि पवार कुटुंबाचा द्वेष होईल असे वक्तव्य करत असतात. यातून ते मोठे नेते होतील अशी त्यांची धारणा आहे. आज त्यांनी जयंत पाटील साहेब यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. यातून त्यांनी त्यांचे संस्कारच दाखवले आहेत. यावरून हल्ली भाजपच्या राजकारणाचा स्तर किती खालच्या पातळीवर गेला आहे हे दिसून येते. मात्र ज्या नेत्यांनी भाजपाची स्थापना केली त्यांच्या राजकारणाची पातळी अतिशय वरच्या स्तरातील होती. पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट साहेब हे भारतीय जनता पार्टीत होते, मात्र त्यांची इतर पक्षातील नेत्यांशी मैत्री कायम होती. त्यांनी वाढदिवसानिमित्त एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हल्ली पक्षात आले की लगेच पद हवे असते असे अयारामाना उद्देशून ते म्हणाले होते.
त्यावेळी शरद पवारांच्या कार्यपद्धतीची स्तुती करताना ते म्हणाले होते, पवार हे राजकीय विरोधक असले तरी कामाचा उत्साह त्यांच्याकडून शिकता येतो, पण सध्या त्यांचे हे गुण घेण्याऐवजी परस्पर वैरभाव वाढीला लागतो आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. मुद्दे सोडून वैयक्तिक टीका टिप्पणी केली जाते आहे त्यामुळे मन अवस्थ आणि उद्विग्न होतंय. वैयक्तिक किंवा तत्कालिक फायद्यासाठी राजकीयसंस्कृती बिघडून चालणार नाही असा सल्ला त्यांनी स्वपक्षीयांना दिला होता. सध्या विकृत राजकारण करणाऱ्या नवभाजपवासियांनी बापट यांचा सल्ला कायम लक्षात ठेवला पाहिजे असे ही माने म्हणाले.