पुणे : ‘पुणे ग्रँड चॅलेज टूर सायकलिंग स्पर्धेकरिता सुमारे ५० देशाचे खेळाडू भारतात येणार असल्याने त्यांच्या सुरक्षितेच्यादृष्टीने पोलीस विभागाची महत्वाची जबाबदारी आहे, त्यामुळे युसीआय (Union Cycliste Internationale) मानकांनुसार संपूर्ण स्पर्धेची सुरक्षात्मक उपायोजना करण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुणे ग्रँड चॅलेज टूर सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग आणि परिवहन विभागासोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुणे ग्रँड चॅलेज टूरचे तांत्रिक संचालक पिनाकी बायसक आदी उपस्थित होते.
श्री. डुडी म्हणाले, ‘पुणे ग्रँड चॅलेज टूर सायकलिंग स्पर्धेच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षा पासेस, सायकलपट्टूची वाहतूक, ट्रॅकवरील सुविधा, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती, त्यांचे प्रशिक्षण, शहरी भागासह ग्रामीण भागातील भौगोलिक परिस्थिती, गर्दी, परिसरातील नागरिकांची जनजागृती, पोलीस अधिकारी व सायकल संघटनांचा समन्वय आदी बाबींचा प्रामुख्यांने विचार करावा. स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत रस्त्याची लांबी सुरक्षेच्यादृष्टीने तपासणी केली करावी. याकामी लवकरात लवकर अधिकारी व कर्मचाऱ्यानी नियुक्ती करावी, त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.त्यानंतर नियोजनामध्ये बदल करु नये.
स्पर्धेचा मार्गावर विशेषत: ग्रामीण भागात प्राणी येणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी. ग्रामीण भागासह शहरी भागात ही स्पर्धा होणार असल्याने पोलीस विभागाचे एकच पथक कॉनव्हसोबत असावे. खेळाडूंच्या आगमनापासून ते प्रयाणापर्यंत ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात यावा. सुरक्षा पासेस देण्याबाबतही नियोजन करावे, सायकलिंग स्पर्धा यशस्वीकरण्याकरिता सर्वसंबंधितांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना श्री. डुडी यांनी दिल्या.
श्री. पाटील म्हणाले, या स्पर्धेच्यावेळी मुख्य मार्गावर वाहतूक नियोजन आणि गर्दीचे व्यवस्थापनाच्यादृष्टीने मोठी जबाबदारी आहे, याकरिता परिसरातील नागरिकांची जनजागृती करावी लागेल. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुक्ष्म नियोजन करुन देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असेही श्री. पाटील म्हणाले.
श्री. बायसकी यांनी स्पर्धेकरिता निश्चित करण्यात आलेले मार्गाची तपासणी, गर्दी व वाहतुकीचे व्यवस्थापन, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती, प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीयदृष्ट्या स्पर्धेचे महत्व,सहभागी खेळाडूद्वारे होणारे सुरक्षेच्यादृष्टीने मुल्यमापन, आपत्कालिन परिस्थिती हाताळतांना घ्यावयाची काळजी, स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत करण्यात येणाऱ्या सुरक्षात्मक उपायोजना, पोलीस विभाग आणि सायकल संघटनामधील समन्वय आदी बाबत माहिती दिली. स्पर्धेचे यशस्वी आयोजन ही आपल्या देशाची प्रतिमा उंचविणारी बाब आहे, त्यामुळे संपूर्ण स्पर्धेदरम्यान चोख पोलीस सुरक्षा पुरविण्यासह गर्दी व वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यावर भर दिला पाहिजे, असेही बायसकी म्हणाले.
























