त्रिभाषा धोरण निश्चिती समितीचा शिक्षण क्षेत्रासह विविध घटकांशी संवाद

पुणे : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने विधानभवन येथे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, भाषातज्ज्ञ, विचारवंत, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, नागरिक आदींशी संवाद साधून त्यांच्या सूचना व प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यात आलेली समिती या अनुषंगाने विभागनिहाय भेटी देऊन विविध घटकांशी संवाद साधत आहे. त्याअंतर्गत विधानभवन येथे हा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, आमदार बापूसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, समितीचे सदस्य तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. अपर्णा मॉरिस, डेक्कन महाविद्यालयाच्या मराठी भाषा विज्ञान प्रमुख डॉ. सोनल कुलकर्णी जोशी, बालमानसतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल, पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे, महाराष्ट्र प्राधमिक शिक्षण परिषदेचे उपसंचालक संजय डोर्लीकर, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची राज्यात अंमलबजावणी कशा पद्धतीने करावयाची या अनुषंगाने शिफारशी करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सन २०२१ मध्ये आपला अहवाल सादर केला होता. त्या अहवालात त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीचीही एक शिफारस आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. जाधव पुढे म्हणाले, राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र कोणत्या इयत्तेपासून, कशा प्रकारे लागू करावे या अनुषंगाने राज्य शासनाने समिती गठित केली असून विभागनिहाय भेटी देऊन मते व सूचना जाणून घेण्याचा निर्णय घेतला असून आज पुणे येथे संवाद साधण्यात येत आहे. यावेळी येणाऱ्या सूचनांचा सखोल विचार करण्यात येईल. तसेच त्रिभाषा समितीचे https://tribhashasamiti.mahait.org हे संकेतस्थळही विकसित करण्यात आले असून त्यावर उपलब्ध करुन दिलेली प्रश्नावली आणि सविस्तर मते मांडण्यासाठीची मतावली भरून संकेतस्थळावर सादर करावी, जेणेकरून येणाऱ्या सूचनांवर विचार करुन राज्य शासनाला डिसेंबर अखेर अहवाल सादर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

See also  मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी;नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

यावेळी खासदार श्रीमती कुलकर्णी, आमदार श्री. पठारे तसेच विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनीही आपले विचार व सूचना मांडल्या.

यावेळी मराठी भाषेशी संबंधित किंवा संलग्न शासकीय किंवा अशासकीय, खासगी शिक्षण संस्थांचे अध्यक्ष, सदस्य, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटना, पालक-शिक्षक संघटनाचे पदाधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शाळांचे मुख्याध्यापक, भाषा विषयाचे शिक्षक आदींनी त्रिभाषा सूत्र अंमलबजावणी, संगणक अभ्यासक्रम, मूल्यशिक्षण आदी अभ्यासक्रमांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने विविध सूचना केल्या.यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.