पुणे : महाराष्ट्र शासनाने राज्यासाठी सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून पुण्यातील युवक कार्यकर्ते सनी विनायक निम्हण यांची निवड करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप पत्रकार विनोद राऊत आणि पत्रकार भगवान परब यांचाही या समितीत समावेश आहे.
सनी निम्हण हे पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक असून, सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवितात. राज्यातील युवकांसाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, उद्योग आणि स्वयंरोजगार या विविध क्षेत्रांत सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे निम्हण यांची या समितीत विशेष निमंत्रित म्हणून निवड करण्यात आली. युवा विकासासंबंधी धोरणात्मक स्तरावर काम करणाऱ्या या समितीत निम्हण यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना सनी विनायक निम्हण म्हणाले,
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्याचे क्रीडामंत्री मधुकर कोकाटे यांनी दाखविलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. युवक धोरण म्हणजे राज्याच्या भविष्यासाठी दिशा देणारे दस्तऐवज असून त्यात काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी यासाठी विशेष आभार मानतो.”
सनी विनायक निम्हण यांच्या समावेशामुळे युवकांच्या विविध गरजा, रोजगार संधी, कौशल्यविकास, सामाजिक सहभाग आणि क्रीडा प्रोत्साहन या क्षेत्रांवर समिती अधिक प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
























