पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२५ रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता येणाऱ्या अनुयायींना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने चोख व्यवस्था करा, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले. दरवर्षी त्याच-त्याच सुविधा पुन्हा कराव्या लागत असल्याने कायमस्वरुपी सुविधा तयार करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
हवेली तालुक्यातील मोजै पेरणे फाटा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, प्र. समाज कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पुणे शहर पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, पिंपरी चिंचवडचे पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याण सहआयुक्त सुरेंद्र पवार, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाने विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने केलेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त करुन मंत्री श्री. शिरसाट म्हणाले, कार्यक्रमासाठी दरवर्षी पार्किंगसाठी खासगी जागा ताब्यात घेणे, सपाटीकरण करणे यावर मोठा खर्च होत असतो. त्यामुळे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शासकीय जागा उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत. त्या परिसरात शासकीय दवाखाना, विश्रांतीकक्ष उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. विजयस्तंभाच्या बाजूच्या जागेबाबत न्यायालयीन वाद सुटण्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयात चांगला वकील नेमून प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.
श्री. शिरसाट पुढे म्हणाले, विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत होत आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना शासनामार्फत आरोग्य सेवा देतानाच अशासकीय स्वयंसेवी संस्थांचा त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी प्रयत्न करावेत. पोलीस विभागावर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी असल्याने शासनाच्या सर्व विभागांनी त्या ठिकाणी केलेल्या आपल्या सुविधांची व कामाची माहिती पोलीसांना तसेच एकमेकांना उपलब्ध करुन द्यावी. कार्यक्रम अत्यंत सुंदर, चांगल्या रितीने संपन्न होईल यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही ते म्हणाले.
राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, विजयस्तंभ सोहळ्याचे उत्तम नियोजन करतानाच अनुयायींना कोणतीही गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घ्यावी. येणाऱ्यांपैकी अनेक अनुयायी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे व बलिदानस्थळाचे दर्शनासाठी वढू बुद्रुक व तुळापूरला जात असल्याने त्या ठिकाणी देखील पार्किंग आदी सुविधा निर्माण कराव्यात. अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता त्याअनुषंगानेही तयारी करावी, अशा सूचनाही श्रीमती मिसाळ यांनी यावेळी दिल्या.
विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, कार्यक्रमाच्या ठिकाणी तसेच नदीपात्राच्या बाजूला एनडीआरएफचे पथक नेमण्यात येते. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाचे पथक नेमण्यात येते. ही पथके आवश्यक त्या सर्व सामग्रीसह सज्ज ठेवावीत. पार्किंग स्थळे रात्री चांगली प्रकाशमान राहतील याची काळजी घ्यावी. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी रात्र गस्त वाढविण्यात यावी.
जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती दिली. कायमस्वरुपी पार्किंगसाठी पीएमआरडीएच्या मोकळ्या जागांबाबत पर्याय तपासण्यात येईल. तसेच कार्यक्रमाच्या वेळी पार्किंगसाठी वक्फ बोर्डाच्या जागेबाबतही प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विविध विभागांनी आपल्या तयारीचा आढावा सादर केला. पुणे पोलीस दलाचे ६ हजार, पुणे ग्रामीणचे ३ हजार व पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे १ हजार इतके मनुष्यबळ बंदोबस्तासाठी लावण्यात येते. जलद प्रतिसादर पथक, सॅटेलाईट फोन, वायरलेस सुविधा आदी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. पीएमपीएमएलच्या बसेसच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. पार्किंग जागा वाढविल्या असून ४५ ठिकाणी पार्किंग करण्यात येत आहेत. विजय स्तंभ परिसरात रॅम्प, सुलभ दर्शनासाठी रांगा व्यवस्थापन, पुस्तकांसाठी १०० बुक स्टॉल उभारण्यात आले आहेत. विजयस्तंभावर रोशनाई व फुलांची सजावट करण्यात येणार आहे. आरोग्य सुविधांसाठी ४३ रुग्णवाहिका नेमण्यात येणार असून पुरेशी आरोग्य पथके ठेवण्यात येत आहेत. १८ खासगी दवाखान्यातील खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठ्यासाठी अनुयायांसाठी १५० व पोलीस दलाला ४० पाण्याचे टँकर नेमण्यात आले आहेत. ४०० शौचालये उभारण्यात येणार आहेत. ९ हिरकणी कक्ष आणि ज्येष्ठांसाठी ७ निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.
बैठकीच्या प्रारंभी दिवंगत माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी मंत्री श्री. शिरसाट यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘विजयस्तंभ सुविधा’ अँड्रॉईड उपयोजकाचे (ॲप) उद्घाटन करण्यात आले. तसेच विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगानरे करण्यात आलेली पार्किंग, जागा स्वच्छता, पीएमपीएमएलचे पिकअप पॉईंट, ज्येष्ठांसाठीचा निवारा आदी तयारी, केलेल्या सुविधांबाबत माहितीची चित्रफीत दाखविण्यात आली.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्यासह संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी, समाजकल्याण विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणय, अग्नीशमन विभाग, जिल्हा परिषद, पीएमपीएमएल, आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
घर ताज्या बातम्या सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या...