पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत असंख्य चुका असून या चुका तातडीने दुरुस्त कराव्यात आणि त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त व प्रकाश दिवटे यांच्याकडे आज केली.
श्री. माने यांनी सांगितले, की प्रभाग आठ, नऊ, सात आणि बारा यांच्यात यादीचे घोळ उडवून देण्यात आले आहेत. त्यात तातडीने दुरुस्ती हाती घ्यावी आणि या गंभीर चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांच्या वतीने आज अतिरिक्त आयुक्तांना शिष्टमंडळ भेटून विविध आक्षेप नोंदविण्यात आले त्यात बोलताना श्री. माने यांनी प्रभाग क्रमांक आठमधील 57, 66, 82 या याद्या प्रभाग सात मध्ये टाकण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रभाग 12 मध्ये 172 ही यादी टाकण्यात आली आहे , जी प्रभाग सातमध्ये अपेक्षित होती. आयसीएस कॉलनीची 139 क्रमांकाची यादी प्रभाग बारामध्ये टाकण्यात आली आहे, जी प्रभाग सातमध्ये असणे अपेक्षित होते.
त्याचबरोबर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत असलेली यादीच या प्रभाग रचनेच्या प्रारूप यादीत प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे अतिरिक्त आयुक्तांच्या म्हणणे श्री. माने यांनी यावेळी सप्रमाण खोडून काढले.
विधानसभा आणि लोकसभेसाठी असलेल्या यादीत शहराच्या मध्यभागी असलेल्या मतदारांना अन्यत्र हलवण्यात आलेले नाही. प्रभाग आठमधील मध्यभागातले मतदार सातमध्ये उचलून टाकण्यात आले आहेत. हे लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी करण्यात आले नव्हते याकडे त्यांनी लक्ष वेधून अशा चुका मुद्दाम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी केली.























