नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर वंचित व दुर्बळ घटकांसाठी सातत्याने कार्यरत असणारे जनसेवक मा. मंगेश सोनवणे यांच्या कार्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन आणि श्रमिक ब्रिगेड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार” त्यांना १० डिसेंबर २०२५ रोजी प्रदान करण्यात आला.
संघटनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील ऐतिहासिक महाराष्ट्र सदन येथे एका दिमाखदार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार मा. रामदासजी आठवले साहेब यांच्या शुभहस्ते हा गौरवशाली पुरस्कार मा. सोनवणे यांना प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे सामाजिक कार्याला दिल्लीच्या दारातून राष्ट्रीय ओळख मिळाली आहे.
मा. मंगेश सोनवणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील दुर्लक्षित, वंचित घटकांसाठी केलेले समर्पित कार्य, जनतेच्या ज्वलंत समस्या सोडवण्यासाठी केलेला अथक संघर्ष आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या भूमिकेची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. विशेषतः कामगार, नागरिक आणि जनसामान्यांसाठी सक्षमीकरण आणि लोककल्याणाच्या दिशेने त्यांनी घेतलेली भूमिका या पुरस्काराचे केंद्रस्थान ठरली.
“हा मिळालेला सन्मान आपल्यासाठी ऊर्जा देणारा असून, भविष्यात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देतो,” अशा भावना मा. मंगेश सोनवणे यांनी व्यक्त करत संयोजक, मार्गदर्शक आणि जनतेचे मनःपूर्वक आभार मानले.हा ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ महाराष्ट्रातील अनेक समाजसेवकांसाठी नवी प्रेरणा ठरला असून, जनतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या प्रत्येक हाताला बळ देणारा असल्याचे गौरवोद्गार या समारंभात काढण्यात आले.
























