पुणे : ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ चा तिसरा टप्पा आतापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक ठरला. पश्चिम घाटाच्या प्रवेशद्वारावर सायकलस्वारांच्या कौशल्याची आणि सहनशक्तीची मोठी परीक्षा पाहायला मिळाली. शर्यतीच्या या आव्हानात्मक तिसऱ्या टप्प्यात चीनच्या ‘ली निंग स्टार’ संघाचा कॅमेरून निकोलस स्कॉट याने बाजी मारली. त्याने १३७ किलोमीटरच्या हा टप्पा ३ तास ४ मिनिटे आणि १३ सेकंदांत पार केला. अर्थात, क्रमवारीत अव्वल क्रमांक कायम राखून ल्यूक मुडग्वे याने ‘यलो जर्सी’वरील वर्चस्व कायम राखले आहे.
सासवड नगर परिषदेच्या चंदन टेकडी येथून दुपारी १२:३० वाजता या टप्प्याला सुरुवात झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून या शर्यतीचा शुभारंभ केला. या वेळी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, नगराध्यक्ष आनंदी जगताप, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव संजय शेटे आदी उपस्थित होते. ‘भारत माता की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘गणपती बाप्पा मोरया’ अशा घोषणांनी शाळेच्या मुलांनी आणि उपस्थित नागरिकांनी परिसर दणाणून सोडला.
यानंतर सायकलपटूंनी बारामतीच्या दिशेने कूच केले आणि विद्या प्रतिष्ठानच्या पेन्सिल चौक येथील फिनिश लाईनच्या जवळ आले, तेव्हा शर्यत अधिक तीव्र झाली. तीन तास खेळाडूंमध्ये जबरदस्त चुरस बघायला मिळाला. यात स्कॉट सर्वांत वेगवान ठरला. अंतिम टप्प्यात स्कॉटने वेग वाढवला. यात त्याने स्पेनच्या बुर्गोस बुर्पेललेट बीएच संघाच्या जॉर्जिओस बुग्लासला (३ तास ०४ मिनिटे १३ सेकंद) मागे टाकले. तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. बेल्जियमच्या टार्टेलेटो-आयसोरेक्स संघाचा तिमोथी ड्युपॉन्ट (३ तास ०४ मिनिटे १३ सेकंद) तिसऱ्या स्थानावर राहिला. मलेशियाच्या तेरेंगानू सायकलिंग टीमचा झेब कायफिन चौथ्या क्रमांकावर राहिला. पहिल्या दोन टप्प्यांचा विजेता ल्यूक (३ तास ०४ मिनिटे १३ सेकंद) या वेळी सहाव्या स्थानावर राहिला. मात्र, त्याने ‘बेस्ट स्प्रिंटर’साठीची हिरवी जर्सी मिळवली आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकूण क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखून ‘पिवळी जर्सी’ स्वतःकडेच ठेवली. तीन टप्प्यांनंतर ल्यूक एकूण ७ तास ३६ मिनिटे १० सेकंद वेळेसह पहिल्या स्थानावर आहे. थायलंडच्या रुजाई इन्शुरन्स विन्स्पेसच्या कार्टर ॲलन बेटल्सपेक्षा तो केवळ १४ सेकंदांनी पुढे आहे.
हा टप्पा अनेकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त कठीण होता. सुरुवातीचे दोन चढण मार्ग आव्हानात्मक होते आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सायकल चालवणे कठीण जात होते; पण वळणदार रस्त्यांवर सायकल चालवताना मला खूप मजा आली- कॅमेरून स्कॉट
उद्या, शुक्रवारी शेवटचा टप्पा
आता सर्वांचे लक्ष चौथ्या टप्प्याकडे म्हणजेच ‘पुणे प्राईड लूप’कडे लागले आहे. हा टप्पा ९५ किलोमीटरचा असून, तो पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा आणि आधुनिक भागांमधून जाणार आहे. बालेवाडी ते जे. एम. रोड असा टप्पा असणार आहे. ल्यूकने यलो जर्सी राखली असली, तरी इतर स्पर्धकांमधील सेकंदांचे अंतर पाहता अंतिम टप्पा अत्यंत रोमांचक होणार आहे.
महत्त्वाच्या जर्सी आणि विजेते
यलो जर्सी (एकूण विजेता) – ल्यूक मुडग्वे
ग्री जर्सी (बेस्ट स्प्रिंटर) – जॉर्जिओस बुग्लास (बुर्गोस बुर्पेललेट बीएच)
पोल्का डॉट जर्सी (किंग ऑफ माउंटेन्स) – क्लेमेंट अलेनो (बुर्गोस बुर्पेललेट बीएच)
ऑरेंज जर्सी (बेस्ट एशियन रायडर) – जंबालजाम्तस सैनबायर (बुर्गोस बुर्पेललेट बीएच)
व्हाइट जर्सी (बेस्ट यंग रायडर )- व्हिएगो टिजसेन (विलरप्लोईग ग्रूट ॲमस्टरडॅम)
ब्लू जर्सी (भारताचा सर्वोत्तम खेळाडू) – हर्षवीर सिंग सेखॉन

























