पुणे : काल पुण्यातील युनिव्हर्सिटी फ्लायओव्हरचे उद्घाटन Devendra Fadnavis यांनी व्हर्च्युअली केले. मात्र उद्घाटनानंतर फ्लायओव्हरच्या कामाच्या दर्जाबाबत काही त्रुटी दिसून येत असल्याचा मुद्दा समोर आला असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी केली आहे.
याबाबत बोलताना निम्हण यांनी सांगितले की, फ्लायओव्हरच्या कामाचे काही फोटो पाहिल्यानंतर उघड्या डोळ्यांनीही काही ठिकाणी काम करताना हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येते. याचा तांत्रिक अभ्यास केल्यानंतरच संपूर्ण निष्कर्ष काढता येईल, कदाचित हा मोठा स्ट्रक्चरल दोष नसेलही; मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होणे चिंताजनक आहे.
निम्हण म्हणाले की, ज्या व्यक्तीला हा फ्लायओव्हर समर्पित करण्यात आला आहे त्या स्वर्गीय अजितदादा यांचा स्वभाव कामाच्या दर्जाबाबत अत्यंत काटेकोर आणि संवेदनशील होता. तसेच उद्घाटन करणारे Devendra Fadnavis यांचाही कामाच्या गुणवत्तेबाबत तसाच दृष्टिकोन आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या त्रुटी दिसणे म्हणजे त्यांच्या कार्यपद्धतीचा अपमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, हा दोष कोणत्याही राजकीय नेतृत्वाचा नसून प्रशासकीय ढिसाळपणा आणि बेजबाबदारपणामुळे अशा त्रुटी निर्माण होत आहेत. राज्य सरकार पुणे शहराला जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करत असून अर्थसंकल्पातही त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. मात्र शहराच्या पायाभूत सुविधा आणि त्याचे सौंदर्य यावरही तेवढेच लक्ष देणे आवश्यक आहे.
युरोप, सिंगापूर किंवा चीनसारख्या देशांमध्ये सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये केवळ दर्जाच नाही तर त्याचे सौंदर्यही जपले जाते. जर पुण्याला जागतिक स्पर्धेत उतरायचे असेल आणि जागतिक कंपन्या व गुंतवणूकदारांना आकर्षित करायचे असेल, तर अशा प्रकारचा दृश्य गलथानपणा टाळणे आवश्यक असल्याचे निम्हण यांनी नमूद केले.
उद्घाटनापूर्वी संबंधित कामाची अंतिम पाहणी करणे आवश्यक असतानाही ती झालेली दिसत नाही, अशी खंत व्यक्त करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“मी एक लोकप्रतिनिधी म्हणून सरकारचा प्रतिनिधी आहेच; परंतु त्याआधी पुणे शहराचा एक जागरूक नागरिक आणि अभियंता म्हणून या विषयाकडे लक्ष वेधत आहे,” असेही नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी स्पष्ट केले.
























