भारतीय प्रजासत्ताक दिन पुण्यात उत्साहात संपन्न
भारतीय संविधानामुळेच देशाची लोकशाही अधिक बळकट– उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री तसेच शौर्य पुरस्कार विजेत्यांचा गौरवपूर्ण उल्लेख
भारतीय संविधानाच्या बळावरच विविध भाषा, धर्म, जाती व संस्कृती असलेला भारत देश जगातील सर्वात मोठे व यशस्वी लोकशाही राष्ट्र म्हणून उभा आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही व्यवस्था टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले.

७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आज पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण व संचलनासह मुख्य शासकीय समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबीय, सैन्यदल, निमलष्करी व पोलीस दलांचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करत श्री. पवार यांनी त्यांना भावपूर्ण वंदन केले. गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद-मराठवाडा मुक्ती संग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीरांचेही त्यांनी अभिवादन केले. देशाची एकता, अखंडता व सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री तसेच शौर्य पुरस्कार विजेत्यांचा गौरवपूर्ण उल्लेख
केंद्र सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या शौर्य व सेवा पदक तसेच पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील मान्यवरांचा समावेश हा राज्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. पोलीस, अग्निशमन, होमगार्ड व सुधारात्मक सेवांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह कला, उद्योग, समाजसेवा, क्रीडा, वैद्यकीय व कृषी क्षेत्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांनी महाराष्ट्राची मान देशपातळीवर उंचावली असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यलढा व सामाजिक सुधारणांच्या चळवळीत पुण्याची भूमिका ऐतिहासिक व निर्णायक राहिल्याचेही त्यांनी सांगितले.

See also  बाणेर-बालेवाडीतील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने पुन्हा एकदा विविध चौकांमध्ये ट्रॅफिक वॅार्डनची नियुक्ती

शेती, उद्योग, व्यापार, सहकार, बँकिंग, आरोग्य व पायाभूत सुविधांच्या विकासात पुणे जिल्हा अग्रेसर असून आयटी हब, ऑटो हब आणि स्टार्टअप्सचे प्रमुख केंद्र म्हणून पुण्याची ओळख देश-विदेशातील तरुणांना आकर्षित करत असल्याचे श्री. पवार म्हणाले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, अभिव्यक्ती व धार्मिक स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाची हमी दिल्यामुळे भारताची लोकशाही अधिक मजबूत झाल्याचे त्यांनी सांगितले.

‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवरच महाराष्ट्राची प्रगती उभी असून हेच विचार राज्याच्या व देशाच्या शाश्वत विकासाचा मंत्र असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. हे विचार सर्वांनी जपावेत, असे आवाहन त्यांनी केले.भारतीय सैन्यदल, नौदल, वायुदल, निमलष्करी दल, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन दल यांच्या अतुलनीय सेवेचा त्यांनी गौरव केला. सीमेवरील त्याग, देशांतर्गत सुरक्षेसाठी केलेले बलिदान व आपत्तीच्या प्रसंगी दाखवलेली तत्परता प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून संविधानाचे पालन, कायद्याचा आदर, सामाजिक सलोखा व विविधतेत एकता जोपासणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे युनिटचे उपअधीक्षक दयानंद सदाशिव गावडे, पोलीस निरीक्षक  अविनाश रोकडेराव शिळीमकर, एसआरपीएफ गट क्रमांक–१ मधील सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप साहेबराव सानंतु, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक आयुक्त विठ्ठल खेहुली कुबडे, तसेच महेंद्र दामोदर कोरे, अमोल फडतरे आणि उपअधीक्षक अनंत माळी यांचा समावेश होता.

उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘स्वच्छ पुणे संकल्प–२०२६’ प्रचार प्रसिद्धी रथास झेंडी
पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छ पुणे संकल्प–२०२६ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धी रथाला आज उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.यावेळी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या त्रिसूत्रीवर आधारित स्वच्छ पुणे, सुंदर पुणे या संकल्पनेवर भर देण्यात आला. प्रचार रथाच्या माध्यमातून कचरा विलगीकरण, प्लास्टिकमुक्ती, स्वच्छता सवयी, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि नागरिकांची जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

See also  “विचारांसाठी लढा महत्त्वाचा” – बाणेरमध्ये हर्षवर्धन सपकाळांचा कार्यकर्त्यांना संदेश; जीवन चाकणकर यांची घेतली भेट

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी, पुणे पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. संदीपसिंह गिल, पुणे महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच स्वच्छता विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.