शिवजयंतीनिमित्त पाषाणमध्ये भव्य रोजगार मेळावा; 5,000 युवक-युवतींना संधी

पाषाण : शिवजयंतीच्या औचित्याने पाषाण येथील भैरवनाथ मंदिर परिसरात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम श्री. निलेश मधुकर निम्हण (सरचिटणीस, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल, नवभारतीय शिववाहतूक संघटना, महाराष्ट्र राज्य) तसेच राजमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी नगरसेवक अमोल भैया वालवडकर, नगरसेविका मयुरी ताई कोकाटे, भक्तीताई गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

या रोजगार मेळाव्यात सुमारे 5,000 युवक-युवतींनी सहभाग नोंदवला. डिलिव्हरी क्षेत्रातील विविध कंपन्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये Swiggy, Zomato, Zepto आणि Blinkit या कंपन्यांचा समावेश होता.
विशेष म्हणजे, कामास इच्छुक असलेल्या प्रत्येक उमेदवारास पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांच्या हस्ते नवीन इलेक्ट्रिक गाड्या मोफत देण्यात आल्या. तसेच संबंधित वाहनांसाठी चार्जिंगची सुविधाही मोफत उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या कार्यक्रमाला संभाजी फुगे, राजू निम्हण, सागर वाखारे, अविनाश लोंढे, ऋषिकेश साखरे, रामदास सकट, गणेश वामने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. युवक-युवतींचा मोठा प्रतिसाद लाभलेल्या या मेळाव्यामुळे शिवजयंती निमित्त सामाजिक बांधिलकीचा एक वेगळा आदर्श उभा राहिल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

See also  भीम नगर वासियांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा