पुण्यात काँग्रेस प्रवक्त्यावर हल्ल्याचा आरोप; निषेध, अटकेची मागणी

पुणे : हनुमंत पवार यांना दैनिक पुढारी कार्यालय, मित्र मंडळ चौक येथे मारहाण झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. या प्रकरणी भाजपशी संबंधित कार्यकर्ता तुषार दामगुडे याने बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत हर्षवर्धन सपकाळ, अध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.“राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. गुंड प्रवृत्तीला कोणत्याही प्रकारे अभय देऊ नये. संबंधित आरोपीला त्वरित अटक करून कठोर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळालेली नसून तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत स्पष्टता होणे बाकी आहे. पोलिस तपासानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

See also  महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया स्किल्स हब उभारणीमुळे शिक्षण-उद्योग सहकार्यास नवी दिशा मिळणार -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील