मुळशीतील बेकायदेशीर उत्खननामुळे जीवितहानी; “मुळशीचा विध्वंस थांबवा” — सह्याद्रि वाचवा मोहिमेची मागणी

मुळशी : मुळशी तालुका येथे मागील काही वर्षांपासून डोंगर फोडून खडी, मुरूम, दगड व मातीचे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. उत्खननानंतर संबंधित जमिनींवर मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग व बांधकाम सुरू असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत असून गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दिनांक १८ फेब्रुवारी रोजी रिहे खोरे, मोजे कातरखडक येथे माती वाहून नेणारा डंपर घरात घुसल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा प्रकार बेकायदेशीर उत्खनन व जड वाहनांच्या बेफाम वाहतुकीचा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खेचरे, बेलावडे, मंदेडे, अंदेशे, शेरे, माले, मुळशी, निवे, ताम्हिणी, वळणे तसेच मुठा व कोळवण खोरे परिसरातील अनेक गावांमध्ये अशाच प्रकारचे उत्खनन व अनधिकृत प्लॉटिंग सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. डोंगरांचे सपाटीकरण, झाडांची तोड आणि अवजड वाहनांची वाहतूक यामुळे पर्यावरणासह ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, सह्याद्रि वाचवा मोहिम पुणे यांनी मुळशीतील अनधिकृत खोदकामाला तीव्र विरोध दर्शवला आहे. “तहसीलदार, प्रांताधिकारी व पुणे जिल्हाधिकारी यांनी संयुक्तपणे तात्काळ पाहणी करून कठोर कारवाई करावी. मुळशीचा विध्वंस थांबवला गेला पाहिजे; अन्यथा सह्याद्री पर्यटनावर गंभीर परिणाम होईल,” अशी मागणी मोहिमेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

पर्यावरणप्रेमींच्या मते, जर वेळेत कारवाई झाली नाही तर डोंगररांगा, जलस्रोत आणि जैवविविधतेचे अपरिमित नुकसान होईल. मुळशीसह सह्याद्री परिसराचा समतोल राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

See also  पत्रकारांचा मुळशी तहसिल कचेरीवर निषेध मोर्चा आंदोलन