बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे नागरिक-नगरसेवक जनसंवाद चे आयोजन

बालेवाडी : बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनने नागरिक आणि नगरसेवक यांना एकत्र आणून “जनसंवाद” हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. बहुधा संस्था, नागरिक लेखी स्वरूपात निवेदने सादर करतात किंवा फक्त प्रतिनिधी भेटतात. परंतु फेडरेशन तर्फे नागरिकांचे प्रत्यक्ष प्रश्न व त्याला नगरसेवकांचे उत्तरे असा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि त्याचे नागरिक व लोकप्रतिनिधींनी  कौतुक केले.

या प्रसंगी नागरिकांनी अपूर्ण रस्ते, तुटलेले फुटपाथ, सुरक्षा, ड्रेनेजचे प्रश्न, साई चौकातील कचरा प्रश्न व भाजी मंडई, राधा चौक आणि एस्केपी कॅम्प आणि रविंद्रनाथ शाळेजवळ होणारी वाहतूक कोंडी, ममता चौकात सिग्नलची गरज, जुपिटर चौकात वाहतुकीचे व्यवस्थित नियमन, फूटपाथवर भरणारे आठवडी बाजार, खंडित होणारा वीजपुरवठा, बालेवाडीतील दारू दुकानामुळे नागरिकांना होणारा त्रास, एमएनजीएल नवीन कनेक्शन इत्यादि प्रश्न उपस्थित केले.

बाणेर- बालेवाडी परीसरातील सुमारे सव्वाशे नागरिक यासाठी एलाईट एंपायर सोसायटीत शनिवारी जमले होते. रोहिणी ताई चिमटे, औंध प्रभाग समिती अध्यक्ष; मयुरीताई कोकाटे, स्थायी समिती सदस्य; जेष्ठ नगरसेवक बाबूराव चांदेरे आणि अमोल बालवडकर, स्थायी समिती सदस्य यांनी नागरिकांना भरपूर वेळ देऊन त्यांचे प्रश्न समजावून घेतले व ते लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. उत्तरे देतांना सर्व नगरसेवकांत समन्वय व सुसुत्रता आढळली. त्यांनी सांगितले की आम्ही सर्व जण मिळून या परिसरातील नागरिकांची कामे मार्गी लावू आणि विकास घडवू.

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे एकत्रीकरण करून ते नगरसेवकांना सादर केले जाणार आहे. जानेवारी २०२६ मध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी फेडरेशन तर्फे नागरिकांचा जाहीरनामा “बालेवाडी वेलफेअर फेडरेशन- डिलिवरेबल्स २०२६-२०३१”  सर्व उमेदवारांना देण्यात आला होता. त्यासंबंधीचा पाठपुरावा येत्या काळात फेडरेशन तर्फे करण्यात येणार आहे.

“जनसंवाद” कार्यक्रम साधारणपणे तीन महिन्यातून एकदा आयोजित करण्यात यावा व त्यात कोणती कामे झाली याचा आढावा घ्यावा असे सर्वानुमते ठरले. आशिष कोटमकर, मोरेश्वर बालवडकर, यश चौधरी, दफेदार सिंह, वंदना चौधरी, शुभांगी चपाटे, शकिल सलाती सचिन,  पाटील, शैलेश पाटील आणि राजीव शहा यांच्या हस्ते नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
फेडरेशनचे अध्यक्ष रमेश रोकडे यांनी फेडरेशनची भूमिका स्पष्ट केली की नागरिकांनी समस्या सोडविण्यासाठी स्वतः पुढे आले पाहिजे. फेडरेशन योग्य ते व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
सुत्रसंचलन योगेश डुंबरे यांनी केले.  शुभांगी चपाटे व शकिल सलाती यांनी माॅडरेटिंग करत सर्वांना बोलायची संधी दिली. मोरेश्वर बालवडकर यांनी आभार मानले.

See also  शासकीय ठेकेदाराचे खंडणीसाठी अपहरण, सिंहगड पायथ्याच्या पोळेकरवाडी येथील घटना ; खंडणीत जग्वार गाडी किंवा दोन कोटी रुपयांची मागणी