“एक महाराष्ट्र, एक महाराष्ट्र केसरी”ची मागणी; कराडहून पैलवानांचे आंदोलन सुरू

कराड (जि. सातारा) : Khashaba Dadasaheb Jadhav स्वर्गीय ऑलम्पिक वीर पैलवान खाशाबा जाधव स्मारक, कराड येथे “एक महाराष्ट्र, एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा” या मागणीसाठी पैलवानांच्या साकडं आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान या आंदोलनादरम्यान आपल्या दादा शासनाकडे सुपूर्द करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पैलवानांनी कराडहून मुंबईतील आझाद मैदानाकडे मोर्चा काढला असून उद्या तेथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 40 महाराष्ट्र केसरी व 15 हिंदकेसरी पैलवान या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.

सध्या महाराष्ट्रात कुस्ती संघटनांमधील वादामुळे वेगवेगळ्या राज्यस्तरीय कुस्ती संघटनांच्या माध्यमातून स्वतंत्रपणे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्यामुळे एकाच वेळी दोन-तीन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असल्याने पैलवानांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

पैलवानांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा मानबिंदू असलेली “महाराष्ट्र केसरी” ही स्पर्धा राज्यस्तरावर एकच असावी. अनेक स्पर्धा झाल्याने या किताबाचे महत्त्व कमी होत असून खेळाडूंमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

या पार्श्वभूमीवर “एक महाराष्ट्र, एक महाराष्ट्र केसरी” ही भूमिका स्पष्ट करत पैलवानांच्या वतीने राज्य शासनाकडे एकच अधिकृत महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची मागणी करण्यात येणार आहे. आझाद मैदानावरील आंदोलनातून या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्याचा पैलवानांचा प्रयत्न आहे.

दरम्यान, राज्यातील विविध भागांतील पैलवान या आंदोलनात सहभागी होत असून कुस्ती क्षेत्रात एकसंध व्यवस्था निर्माण करण्याची मागणी जोर धरत आहे.

See also  मनोज मांढरे यांना संत मुक्ताबाई संस्थानचा " भागवत धर्म प्रसारक " पुरस्कार जाहीर