मुंबई : देशभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, राज्यस्तरापासून गावपातळीपर्यंत तिरंगामय वातावरण व्हावे, या उद्देशाने २ ते १५ ऑगस्टपर्यंत राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना सांस्कृतिक कार्य सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी दिल्या.
केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे ‘हर घर तिरंगा’ अभियान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये राबविला जाणार आहे. यासंदर्भात सचिव डॉ. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, उपसचिव महेश वाव्हळ, सांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चवरे, राज्य मराठी विकास संस्थेच्या उपसंचालक अंजली ढमाळ तसेच दृरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले तसेच विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
राज्यात मागील तीन वर्षापासून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षीचे अभियान तीन टप्प्यात राबविण्यात येत असल्याचे सांगून सचिव डॉ.कुलकर्णी म्हणाले की, पहिला टप्पा २ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबविला जाईल. दुसरा टप्पा ९ ते १२ ऑगस्ट २०२५ तर तिसरा टप्पा १३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून तिरंगामय वातावरण निर्मिती व्हावी, यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी दृश्य माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाची माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तिरंगा स्वयंसेवक यांची नोंदणी करून उत्कृष्ट काम केलेल्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देणे, शाळेच्या भिंतीवर तिरंगाचे चित्र काढणे, तिरंगाविषयक बाबींचे प्रदर्शन भरवणे, रांगोळी स्पर्धा आयोजित करणे, माय गर्व्हमेंट या संकेतस्थळावर प्रश्नमंजूषेत सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करणे, तिरंगा राखी तयार करण्याची स्पर्धा आयोजित करणे असे विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याकडून पत्रलेखन करून ते जवान, पोलिसांना पोस्टल सेवेद्वारे पाठविणे. स्वत:चे घर, आजुबाजूचा परिसर, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविणे, तिरंगाची रोषणाई आणि लाईटिंग करणे असे विविध उपक्रम २ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार असल्याचे सचिव डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
दुसऱ्या टप्प्याची सुरूवात ९ ऑगस्टपासून होत असून यात ‘तिरंगा महोत्सव’ राबविला जाईल. त्याचबरोबर तिरंगा मेळावा आणि तिरंगा कॉन्सर्ट कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत, असे सांगून सचिव डॉ.कुलकर्णी म्हणाले की, तिरंगा मेळाव्याचे आयोजन राज्यात होणाऱ्या सरस महोत्सवासारखे करण्यात येणार आहे. यात तिरंग्याचे प्रदर्शन आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्वांना सहज आणि सुलभरित्या तिरंगा उपलब्ध व्हावा, यासाठी महिला बचत गटाकडे तिरंगा निर्मिती व विक्रीचे काम देण्यात यावे. जिल्हा व गाव पातळीवर तिरंगा बाईक रॅली किंवा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात यावे. त्याचबरोबर या कालावधीत प्रत्येकांच्या हातात तिरंगा देऊन तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात यावे. या मोहिमेत राज्यातील प्रत्येक विद्यार्थी, तरूण-तरूणी आणि नागरिक यांचा सहभाग वाढवून मनुष्यसाखळी तयार करावी, तसेच मोठ्या प्रमाणावर देशभक्तीपर गीते आणि राष्ट्रगीते लावण्यात यावी, असेही डॉ.कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.
तिसरा टप्प्या १३ ऑगस्टपासून सुरू होणार असून यात प्रत्येक घर, कार्यालय, वाहने यावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढवा यासाठी ध्वजारोहणच्या सेल्फी काढून केंद्र शासनाच्या www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याबाबत आवाहन करण्याच्या सूचना सचिव डॉ.कुलकर्णी यांनी दिल्या.
घर ताज्या बातम्या राज्यात आजपासून ‘हर घर तिरंगा’ अभियानाची सुरूवात – सांस्कृतिक कार्य सचिव डॉ.किरण...