बाणेरमध्ये फुटपाथवर दुहेरी पार्किंगचा निषेध; नागरिकांना धमकावल्याप्रकरणी हॉटेलविरोधात गुन्हा दाखल

पुणे : बाणेर परिसरातील फुटपाथवर दुहेरी पार्किंग करून पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या हॉटेल व्यवस्थापनाच्या विरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात एका सजग नागरिकाने प्रश्न विचारल्यानंतर त्याला धमकावल्याचा आरोप होत असून, विविध नागरी संघटना आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत बाणेर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.

बाणेर रोडवरील कपिल मल्हार समोर असलेल्या Gulmohar Restaurant समोर फुटपाथवर वाहनांची दुहेरी पार्किंग केली जात असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत होते. या संदर्भात एका नागरिकाने हॉटेल व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता चूक सुधारण्याऐवजी हॉटेलच्या स्टाफकडून उद्धट वर्तन, दमदाटी आणि धमकावण्याचे प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेच्या निषेधार्थ बाणेर परिसरातील सक्रिय नागरिक संघटना BBPRA आणि BBNM तसेच अनेक स्थानिक नागरिक त्या पीडित नागरिकाच्या समर्थनार्थ एकत्र आले. नागरिकांचा मोठा समूह बाणेर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन औपचारिक तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर संबंधित व्यवस्थापनाविरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.नागरिकांनी फुटपाथवरील नियमबाह्य दुहेरी पार्किंग तसेच नागरिकांशी गैरवर्तन याबाबत पोलिसांकडे तक्रार मांडली.

या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी तक्रार नोंदवून घेतली असून संबंधित हॉटेल स्टाफवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच नागरिकांच्या तक्रारींवर पोलिस प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बाणेर-बालेवाडी परिसरातील फुटपाथवरील अतिक्रमणांची माहिती महानगरपालिका व पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले. अनधिकृत बार आणि हॉटेल्सवरही कारवाई करण्यात येईल, असे सांगत नागरिकांनी निर्भीडपणे पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

See also  महानगरपालिकेतील एकवट मानधनावरील 149 कर्मचारी कायमस्वरूपी रुजू होण्याच्या प्रस्तावाला सरकारची मान्यता