पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवरील चेंबर्स समपातळीत आणणे आणि फुटपाथ दुरुस्तीच्या कामांना गती देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. या संदर्भात आज महापालिकेत आढावा बैठक पार पडली.
शहरात नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेदरम्यान सुमारे २ हजार चेंबर्स समपातळीत आणून मार्ग सुरळीत करण्यात आला होता. मात्र हे काम केवळ स्पर्धेच्या मार्गापुरते मर्यादित राहिल्याने इतर भागांमध्ये अजूनही पावसाळी व ड्रेनेज चेंबर्स खाली राहून अपघातांची शक्यता कायम आहे.
महापालिकेच्या पथ विभागामार्फत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘खड्डेमुक्त रस्ते अभियान’ राबवण्यात येत असून, १५ डिसेंबर २०२५ पासून शहरभर चेंबर्स समपातळीत आणण्याचे काम सुरू आहे. सायकल स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या एसओपीनुसारच ही कामे केली जात आहेत.
शहरातील विविध झोनमध्ये ठेकेदार नेमून कामे सुरू असून, दररोजच्या कामाचा आढावा आयुक्तांकडे सादर केला जात आहे. आतापर्यंत सुमारे १,२८३ चेंबर्स समपातळीत आणण्यात आले आहेत. पावसाळी वाहिन्यांवरील चेंबर्स पथ विभागाकडून तर ड्रेनेज चेंबर्स ड्रेनेज विभागाकडून दुरुस्त केले जात आहेत.
दरम्यान, रात्रीच्या वेळी रस्ता कटर व ब्रेकरमुळे होणाऱ्या आवाजामुळे नागरिक व विद्यार्थ्यांकडून तक्रारी येत असल्याने कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. तरीही शक्य त्या ठिकाणी आवश्यक दक्षता घेऊन कामे सुरू ठेवण्यात येत आहेत.
रस्त्यांचे डांबरीकरण झाल्यानंतर चेंबर्सची पातळी खाली गेल्याने निर्माण होणारे खड्डे आणि त्यातून होणारे अपघात टाळण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. अधिकाधिक चेंबर्स लवकरात लवकर समपातळीत आणण्याचे निर्देश आयुक्तांनी प्रशासनाला दिले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (विद्युत) मनीषा शेकटकर, मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.























