पुणे, दि. २९ जून : खडकी कॅंटोन्मेंट हद्दीतील खडकी यंग क्लब (KYC) परिसरात, शेवाळे टॉवर्सच्या पाठीमागील रस्त्यावर अल्प पाऊस झाला तरी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येची तातडीने दखल घेऊन रस्ता समतल करावा व पाण्याचा योग्य निचरा करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
सदर ठिकाणी रस्त्याचा काही भाग खोलगट असल्याने १५ ते २० मिनिटांच्या पावसानंतरही पाणी दीर्घकाळ साचून राहते. त्यामुळे दुचाकी व तीनचाकी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. याबाबत अनेक नागरिकांनी मनसेकडे तक्रारी केल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २९ जून) मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी छावणी परिषदेला निवेदन देण्यात आले. रस्ता तातडीने दुरुस्त करून समतल करावा, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करावी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी मनसेचे विभागाध्यक्ष विजय बेल्हेकर, मिलन भोरडे, प्रणव हुले, जय बोजवारे, ज्ञानेश्वर कोळेकर, हृषीकेश जाधव, किशोर इंगवले तसेच मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















