पुणे, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागांतर्गत उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे शहर (२) कार्यालयाने औंध येथील तेजस्विनी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. विरोधात गंभीर अनियमितता आढळल्याने अंतिम आदेश जारी केला आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १०२(१)(क) अन्वये ही कारवाई करण्यात आली असून, संस्थेच्या कामकाजात अनेक नियमभंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संस्थेने नियमितपणे वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली नाही, लेखापरीक्षण अहवाल वेळेत सादर केला नाही तसेच सदस्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात श्री. प्रविण नवले यांनी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संबंधित संस्थेला वेळोवेळी नोटिसा देऊन खुलासा मागविण्यात आला. दिनांक २३/०९/२०२४ व २४/१०/२०२४ रोजी सुनावण्या घेण्यात आल्या. मात्र, संस्थेकडून समाधानकारक उत्तर सादर करण्यात आले नाही. तसेच, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनांमध्ये विसंगती आढळल्याचेही निदर्शनास आले आहे. काही सदस्यांनी संस्थेच्या कारभाराबाबत गंभीर आक्षेप घेतले असून, लेखा तपासणी, सभांची अनुपस्थिती आणि प्रशासकीय दुर्लक्ष याबाबत तक्रारी केल्या होत्या.
उपनिबंधकांनी दिलेल्या आदेशानुसार, संस्थेच्या कारभारात प्रशासकीय हस्तक्षेप करण्यात येणार असून पुढील कार्यवाहीसाठी संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, आवश्यक असल्यास व्यवस्थापन समितीवर कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
या कारवाईमुळे औंध परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित संस्थेच्या सदस्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील काळात प्रशासन कोणती कठोर पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
























