पुणे : सध्या जगभरात युद्धग्रस्त परिस्थिती असल्याचे आढळून येत आहे. एकविसाव्या शतकातही सुरू असलेली युद्ध दुर्दैवी असून या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘युद्ध नको, बुद्ध हवा’, हा संदेश जगासाठी उद्बोधक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
पद्मपाणी फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पाली व बौद्ध अध्ययन विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या पाली साहित्य संमेलनाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या पाली विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बिमलेन्द्र कुमार, गगन मलिक, भदंत हर्षबोधि महाथेरो, डॉ योजना भगत, उपमहापौर परशुराम वाडेकर, धम्मदीप वानखेडे, डॉ. करुणा जाधव, डॉ नीरज बोधी, स्वागताध्यक्ष डॉ सिद्धार्थ धेंडे, डॉ. गौतम चाबुकस्वार, संयोजक राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
पाली भाषेने जगाला ज्ञान प्रदान केले आहे. विज्ञानवाद, समानता, मानवता आणि शांततेचे ज्ञान, बौद्ध तत्त्वज्ञान पाली भाषेतूनच जगभरात पोहोचले आहे. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण प्रयत्न केले असून यापुढे पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हावा यासाठी शासकीय पातळीवर सर्व प्रकारची मदत करू, अशी ग्वाही आठवले यांनी यावेळी दिली. जगभरातील युद्धस्थिती, समाजातील असमानता, हिंसाचार दूर करण्यासाठी पाली भाषेचा प्रसार आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान आणि समृद्ध भारतीय परंपरेचे भांडार पारिभाषेत उपलब्ध असून दुःखातून बाहेर पडून समाधान प्राप्त करण्याचा, चित्तशुद्धीचा मार्ग पाली भाषाने दाखवला आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमापासून पालीचा समावेश ऐच्छिक भाषा म्हणून होणे आवश्यक आहे, असे मत बिमलेंद्र कुमार यांनी व्यक्त केले. बौद्ध तत्त्वज्ञानाप्रमाणेच सामाजिक, आर्थिक, राजनैतिक अशा सर्व विषयांवरील व्यापक साहित्य पाली भाषेत उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी त्याचे संवर्धन व प्रसार व्हावा यासाठी कोणताही कार्यक्रम हाती घेण्यात आला नाही. राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या धर्तीवर पाली भाषेच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय विद्यापीठ किंवा संस्थेची स्थापना करण्यात यावी. महाविद्यालयांमध्ये पाली भाषेच्या प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त असून ती ताबडतोब भरण्यात यावी, अशा मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.
सध्याच्या काळात केवळ पाली भाषाच नव्हे तर बौद्ध धम्म धोक्यात आला असल्याची भीती गगन मलिक यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. सर्वसामान्यांना ज्ञान देण्याची जबाबदारी असलेल्या प्रथम पाली भाषेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. बौद्ध धर्माचे संवर्धन व प्रसार करणाऱ्या भिक्षूची संख्या मर्यादित आहे. समाजातील सुशिक्षित आणि कर्तृत्ववान युवक भिक्षू होण्यास तयार नाहीत, अशी खंत व्यक्त करतानाच मलिक यांनी भिक्षू होण्याची तयारी असलेल्या युवकांच्या थायलंड मधील पंधरा वर्षाच्या प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी देखील दर्शविली.
पाली भाषा ही माणसांना जोडणारी, मैत्रीची आणि परिवर्तनाची भाषा असल्याचे भदंत हर्षबोधी महाथेरो यांनी नमूद केले. बौद्ध धर्माचा, गौतम बुद्धांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचा, विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भिख्खू संघाने एकत्र येऊन पुढाकार घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. पाली भाषेतील समृद्ध साहित्य सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवादित केले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे चिवर धारण न केलेले संन्यासी होते, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
पाली भाषेच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी हाती घेतली पाहिजे, असे आवाहन सुवर्ण डंबाळे यांनी प्रास्ताविकात केले. यावेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पाली भाषेच्या प्रसारासाठी निधी मिळावा आणि प्राथमिक शिक्षणात पाली भाषेचा समावेश करावा, अशा मागण्या केल्या. राहुल डंबाळे यांनी पाली भाषेच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य पालीमध्ये अनुवादित करण्याची घोषणा यावेळी केली. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. महेश देवकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. त्याचप्रमाणे पाली भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणारे गायक पावा, गगन मलिक, अतुल भोसेकर आणि संमेलन अध्यक्ष बीमलेन्द्र कुमार यांचाही सत्कार करण्यात आला.























