अवकाळी पावसाचा तडाखा; महापौर मंजुषा नागपूरे यांचे तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

पुणे : शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा ताई दीपक नागपूरे यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या शहरातील विविध भागांत पाणी साचणे, झाडे कोसळणे तसेच वाहतुकीत अडथळे निर्माण होणे अशा समस्या मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या आणि नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महापौरांच्या निर्देशानुसार धोकादायक झाडे व फांद्या हटविणे, झाडांची छाटणी करणे तसेच नाले आणि गटारांची तातडीने साफसफाई करण्याची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत.

याशिवाय महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह सर्व १ ते ५ परिमंडळांतील उपायुक्तांना तत्काळ आणि प्रभावी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेच्या संबंधित विभागांशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन संपर्क क्रमांक :
📞 02025506800
📞 02025501269

See also  महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण