१८०० कोटींचा महसूल बुडवून ३६०० किमी अनधिकृत केबल्सचे जाळे; पुणे महापालिकेची धडक कारवाई सुरू

पुणे : शहरभर पसरलेल्या अनधिकृत आणि धोकादायक ओव्हरहेड केबल्सविरोधात पुणे महानगरपालिकेने आजपासून मोठी धडक मोहीम सुरू केली आहे. स्वतंत्र पथके स्थापन करून ही कारवाई राबविण्यात येत असून, दर आठवड्याला शहरातील विविध भागांमध्ये मोहीम सुरू राहणार आहे.

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले की, महानगरपालिका क्षेत्रात तब्बल ३,६०० किलोमीटर लांबीच्या केबल्स अनधिकृत असल्याचे सर्वेक्षणात उघड झाले आहे. या केबल्समुळे महापालिकेचा सुमारे १८०० कोटी रुपयांचा महसूल बुडाला असल्याचा अंदाज आहे.

आज पुणे-सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटी परिसरात विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग आणि अग्निशमन विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अनधिकृत केबल्स हटविण्यात आल्या. यावेळी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भिमाले म्हणाले की, नियमांनुसार केवळ भूमिगत केबल टाकण्यास परवानगी असतानाही अनेक कंपन्यांनी खांबांवर अनधिकृत केबल्स टाकून शहराचे विद्रुपीकरण केले आहे. चौक, रस्ते आणि इमारतींवर गुंतागुंतीचे केबल जाळे तयार झाल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. विशेषतः गाईडरोप केबल्समध्ये ॲल्युमिनियम तारा वापरल्या जात असल्याने विजेचा धक्का बसून जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अशा सर्व केबल्सवर टप्प्याटप्प्याने कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर यांनी सांगितले की, जानेवारीपासून सुरू असलेल्या प्राथमिक कारवाईत आतापर्यंत १२३.६ किलोमीटर अनधिकृत केबल्स हटविण्यात आल्या आहेत. आता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

महापालिकेने स्पष्ट इशारा दिला आहे की, केबल टाकण्यासाठी पूर्वपरवानगी आणि शुल्क अनिवार्य असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. सर्व सेवा पुरवठादारांनी भूमिगत केबल्स टाकण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शहर अधिक सुरक्षित आणि सुशोभित करण्याच्या दृष्टीने ही मोहीम निर्णायक ठरणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

See also  बोपोडी येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन