कुरकुंभचा ध्वजामंडप शिवकालीन; फिरंगाई देवी संदर्भातील मोडी लिपीतील अज्ञातपत्रातून आली माहिती समोर

पुणे : मौजे कुरकुंभ ( प्राचीन मराठा कालखंड नाव कुरकुंब ) तर्फ पाटस तालुका दौंड,पुणे येथे श्री फिरंगाई शक्ती देवीचे देवस्थान जागृत प्राचीन व पुरातन आहे. देवीच्या संदर्भाने अप्रकाशित मोडी लिपीत असलेले आज्ञापत्र श्रीमन महाराज क्षेत्रीय कुलवंत राजाराम छत्रपती यांचे आहे. या आज्ञापत्राची तारीख खरे जंत्रीनुसार 27 ऑगस्ट 1698 इसवी सन रोजीचे आहे. रंग देवीचे वंशपरंपरागत पुजारी श्री मच्छिंद्र भगत (कुरकुंभ) यांच्या मागणीवरून पुणे पुरालेखागार पुणे यांनी दिले.या मार्फत मोडी लिपीवाचक इतिहास अभ्यासक, पुराततत्व शास्त्रज्ञ  कांचन कोठावळे (पुणे ) ह्यांना प्राप्त झाले.

मोडी लिपीत असलेले आज्ञा पत्रातील मजकुरानुसार छत्रपती राजाराम महाराज यांनी राज्याभिषेक शक 25, बहुधान्य संवत्सर, भाद्रपद शुद्ध द्वितीया, मंद वासरे  (शनिवारी ) त्यादिवशी तत्कालीन देशाधिकारी व देश लेखक वर्तमान भागी नरहर आपदेव यांसी दिले. मंदिरातील परंपरागत तत्कालीन पुजारी कृष्णाजी व सुभानजी भगत यांनी सातारी येऊन विदित केले की देवस्थान मोठे जागृत आहे. कैलासवासी महाराज राजेश्री स्वामी म्हणजेच शककर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी देवळास ‘ध्वज्या’ ध्वज मंडप बांधले. हा नवा ऐतिहासिक पैलू उजेडात आला तसेच शिवछत्रपतीच्या कालखंडात देवीची पूजा नैवेद्य नंदादीप व उत्सव चालवले जात होते. पत्रातील मजकूर उल्लेखानुसार छत्रपती संभाजी महाराज “धामधुमीचा  प्रसंग जाहला” यामुळे “देवाचे काही चालत नाही”. असे आले आहे. म्हणजेच देवीचे सर्व उत्सव सुरळीत नाही देवीचे उत्सव चालविणे याकरिता पुजाऱ्यांनी छत्रपती राजाराम महाराज कथन केले. “श्री बहुत थोर ज्याग्रत देवस्थान आहे, तेथे राजश्री कैलासवासी स्वामींनी निष्ठा धरून देवाचे चालवीत होते  ( छत्रपती शिवाजी महाराज) तसेच स्वामींनी देवाचे चालविले या स्वामी व स्वामीचे राज्यास कल्याण विशेषत्कार होईल’. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज असताना देवाचे कार्य सुरळीत होते तसेच स्वामींनी छत्रपती राजाराम महाराज यांनी देखील तसेच देखील चालवले तर राज्यात कल्याण होईल असे नमूद आहे. तसेच ” धामधुमीचा काळ मुलखात गेला ” राज्यात अनेक युद्ध प्रसंगामुळे धामधुमीचा काळ होते यामुळे देवीचे उत्सव थांबले होते.

See also  धायरी  गावचे ग्रामदैवत श्री. कालभैरवनाथाची यात्रा उत्साहात,निकाली कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे नियोजन

या प्रित्यर्थ छत्रपती राजाराम महाराज यांनी देवीचे भोग पूजा नैवेद्य नंदादीप व श्रीचे चाकरी लोक यांचे वतन नित्यपुराण सांगण्यासाठी पुराणिकाचे वर्षासन नित्य अभिषेकी ब्राह्मण याचे वर्ष असून व अन्नछत्र नेमणूक करण्याची आज्ञा अष्टप्रधान मंडळातील पंडितराव यास केली या पत्राची तालीक (नकल ) लिहून घेऊन मुख्यपत्र देवीचे पुजारी यापाशी देणे असे आज्ञापत्रात नमूद केले आहे. या कार्यासाठी श्री मच्छिंद्र भगत व श्री गणेश शिरसागर  (गुरव ) मंदिर पुजारी यांचे मोलाचे सहाय्य लाभले आहे.

इतिहास अभ्यासक कांचन कोठावळे म्हणाल्या,”फिरंगाई देवीचा सभा मंडप छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला ही माहिती राज्यसमोर आणताना आनंद होत आहे. ही माहिती समोर आल्याने देवीच्या मंदिराचे महत्त्व अधिक वाढले आहे. तसेच कुरकुंभ च्या इतिहासामध्ये देखील एक वैभवशाली नोंद झाली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने देखील या वास्तूचे जतन व संवर्धन करण्याचे आदेश फेब्रुवारी 2026 मध्येप्रशासनाला दिले आहेत.”