ॲड.विजयराव झोळ यांना जीवनगौरव पुरस्कार ; कृषी पर्यटनाचे ज्येष्ठ शिलेदार ; लोकमंगल प्रतिष्ठानतर्फे अमृतमहोत्सवी (७५) वर्षानिमित्त गौरव सोहळा

पुणे, ता.‌१: लोकमंगल प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महासंघाचे (मार्ट) सचिव ॲड.विजयराव मल्हारराव झोळ यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार माऊली महाराज जंगले यांच्या हस्ते वारजे येथे प्रदान करण्यात आला.

ॲड.झोळ यांच्या अमृत महोत्सवी (७५) वर्षानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला लोकमंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे, क्षत्रिय मराठा दिंडीचे विश्वस्त माणिक दुधाने, जिल्हा सरकारी वकील(निवृत्त) ॲड.नरेंद्र निकम, योगाचार्य अनंतराव झांबरे, सोलापूरचे सुधीर जाधव, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र ननावरे, राजाभाऊ गिजरे, बाळासाहेब चव्हाण, ॲड.चेतन झोळ यांच्यासह राज्यभरातील कृषी पर्यटन केंद्र चालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“समाजाच्या जडणघडणीत काम करणाऱ्या ज्येष्ठ मंडळींचा सन्मान करणे हीच महाराष्ट्राची परंपरा आहे.” असे गौरवोद्गार माऊली जंगले महाराज यांनी काढले.

बराटे म्हणाले, “ॲड.झोळ यांनी बांगलादेश युद्धकाळात बिनतारी संदेश यंत्रणेत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. पोलिस सेवेत असताना वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. निवृत्तीनंतरही त्यांची ऊर्जा प्रेरणादायी ठरली. वाचनाची आवड आणि अभ्यासामुळे त्यांचा दृष्टिकोन व्यापक होता. शेतकऱ्यांविषयी तळमळ असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जात. महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महासंघ स्थापनेनंतर मी अध्यक्ष आणि ॲड.झोळ सचिव अशी जबाबदारी आम्ही स्वीकारली. वयाने, अनुभवाने मोठे असूनही त्यांनी ते कधी जाणवू दिले नाही. कृषी पर्यटनासाठी प्रशिक्षण शिबिरे व अभ्यासक्रम तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना फायदा झाला, ग्रामीण पर्यटनाकडे युवक आकर्षित झाले आणि अनेक शेतकरी नावारूपाला आले. अभ्यास, वाचन, चिंतन आणि नंतर व्यक्त होणे हा त्यांच्या स्वभावाचा महत्त्वाचा पैलू होता.”

सूत्रसंचालन संजय मरळ यांनी केले. तर आभार प्रदर्शन राजाभाऊ गिजरे यांनी मानले.

See also  तीन तरुणांच्या सतर्कतेमुळे चार महिलांसह एक बालक आणि पुरुषाला जीवदान ;खडकवासला धरण नदीपात्रातील थरकाप उडवणारी घटना