बाणेर–पाषाण लिंक रोडवर पार्किंगचा विळखा; पासपोर्ट कार्यालयामुळे वाहतूक कोंडी वाढली, क्षेत्रिय कार्यालयात बैठकीचे आयोजन

पुणे : बाणेर–पाषाण लिंक रोड परिसरात नव्याने सुरू झालेल्या पासपोर्ट कार्यालयामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या अनियंत्रित पार्किंगमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या समस्येच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक सनी निम्हण यांच्या पुढाकारातून औंध क्षेत्रीय कार्यालयात महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पासपोर्ट कार्यालयाचे अधिकारी, वाहतूक पोलीस, पुणे महानगरपालिकेच्या पथ, बांधकाम व इतर विभागांचे अधिकारी, स्थानिक नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. रस्त्यावर होणारे अनधिकृत पार्किंग रोखणे, पर्यायी पार्किंग व्यवस्था निर्माण करणे, तसेच वाहतूक नियोजन अधिक प्रभावी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय नायकल, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका रोहिणी चिमटे आणि नगरसेविका भक्ती गायकवाड, राहुल कोकाटे, बाणेर पाषाण लिंक रोड रेसिडेन्शियल असोसिएशनचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आदी उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक सनी निम्हण यांनी बाणेर पाषाण लिंक रोड परिसरात वाहतूक नियोजन करण्यात यावे, पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी तसेच आवश्यक ठिकाणी सूचनाफलक लावण्यात यावेत. बाणेर पाषाण लिंक रोड परिसरातील नागरिकांची गैरसोय होणार असल्यास कार्यालयाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

यावेळी नगरसेविका रोहिणी चिमटे यांनी बाणेर पाषाण लिंक रोड परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पार्किंग व्यवस्थांची पाहणी करण्यात यावी अशी मागणी केली. तर राहुल कोकाटे यांनी पासपोर्ट कार्यालयाच्या अनुषंगाने नागरिकांच्या सुविधा व्हाव्या यासाठी पर्यायी रस्ते पूर्ण करण्यात यावेत व पुणे महानगरपालिकेच्या मोकळ्या जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून विचार व्हावा अशा सूचना केल्या.

रहिवासी भागांमध्ये पुणे महानगरपालिकेने कमर्शियल बिल्डिंग मोठ्या प्रमाणात बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे यामुळे सध्याच्या व्यवस्थांवर ताण निर्माण होत आहे. बाणेर पाषाण लिंक रोड परिसरातील कमर्शियल बांधकामे यांच्या पार्किंगची तपासणी करण्यात यावी. तसेच कमर्शियल बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी नागरिकांनी बैठकीमध्ये केली.

See also  बावधन पाषाण सुस महाळुंगे परिसरातील समस्या सोडवण्यासाठी आमदार शंकर मांडेकर यांनी घेतली पुणे मनपा आयुक्तांची भेट

स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर ठोस उपाययोजना राबवून वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार बाणेर पाषाण लिंक रोड परिसरातील कमर्शियल इमारतींची परवानगी व पार्किंग व्यवस्था यांची पाहणी करून अहवाल देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.