पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय एकदिवसीय मूल्यशिक्षण कार्यशाळा “लिंगभाव संवेदनीकरण” या विषयावर आयोजित करण्यात आली. या एकदिवसीय शिबिरात १०० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शिबिराची सुरुवात महाराष्ट्र राज्य गीत आणि राष्ट्रीय सेवा योजना गीत सादर करून झाली. सुप्रसिद्ध औद्योगिक वकिल श्री. महेश लाड, शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्रा. सुचेता खोत तसेच आमच्या महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी नुपुर जगताप हे प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून लाभले.
लिंगभाव संवेदनीकरण सारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विद्यार्थ्यांशी चर्चा, संवाद तसेच गटवार वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांमधून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. पथनाट्य, रिल्स, पोस्टर्स, भाषणं, डिबेट, गटचर्चा यांसारखे उपक्रम घेण्यात आले. या कार्यशाळेमध्ये पुणे जिल्ह्यातील १२ महाविद्यालयांचे विद्यार्थी -विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव, उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार यांची उपस्थिती आणि सहकार्य लाभले. तसेच, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी आणि समन्वयक प्रा. सविता इटकरकर, प्रा. डॉ. स्मिता जाधव आणि प्रा. सीमा हाडके यांनी उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेविका दिक्षा, वैष्णवी, पूर्वा, सावरी आणि इतर विद्यार्थिनींनी मेहनत घेतली.
हा उपक्रम नव्या पिढीमध्ये लिंगभाव संवेदनीकरणाची जाणीव निर्माण करणारा ठरला.