पुणे : पाषाण तलाव येथे पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण झाली असून हजारोच्या संख्येने मासे मृत पावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तलावामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी साठल्यामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
तलावात साचलेल्या जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटले असून त्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय, तलावात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात असल्याने पाण्याची गुणवत्ता खालावली असून परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
या घटनेमुळे तलाव परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पाषाण परिसरातील रहिवाशांमध्ये यामुळे चिंता वाढली आहे.
पाषाण तलाव हा जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा परिसर मानला जातो. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे येथील जैवविविधता धोक्यात आली असून पर्यावरणप्रेमींनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, तलावातील जलपर्णी काढण्यासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. पाषाण तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी आणि जैवविविधता टिकवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच जलपर्णी त्वरित हटवावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.























