पुणे, दि. २९ जून : नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी स्वागत केले आहे. या प्रकरणातील झटपट तपास आणि अल्पावधीत लागलेल्या निकालामुळे गुन्हेगारांमध्ये जरब निर्माण होण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात चवधरी यांनी म्हटले आहे की, अवघ्या काही महिन्यांत तपास पूर्ण करून न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याने निष्पाप बालिकेला न्याय मिळाला आहे. या प्रकरणात पोलीस यंत्रणेने दाखविलेली तत्परता, सखोल तपास, गोळा केलेले भक्कम पुरावे आणि प्रभावी तपासामुळेच न्यायालयाला कमी कालावधीत अंतिम निर्णय देणे शक्य झाले. त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्याबाबत समाजात समाधानाची भावना आहे.
तथापि, राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले. अनेक पीडित महिलांना अजूनही न्यायाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जलदगतीने सुनावणी पूर्ण व्हावी आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा दीप्ती चवधरी यांनी व्यक्त केली.















