महाळुंगे बालेवाडी स्टेडीयम परिसरात अवैध प्रकारांना ऊत; नागरिक त्रस्त

महाळुंगे  : बालेवाडी–महाळुंगे परिसरातील बालेवाडी स्टेडियमजवळील मेट्रो स्टेशन परिसरात सायंकाळनंतर वाढणाऱ्या अवैध हालचालींमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर काही महिला उभ्या राहत असल्याने व त्याठिकाणी संशयास्पद हालचाली वाढल्याने नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, संध्याकाळच्या वेळेत या परिसरात बाहेरील लोकांची वर्दळ वाढते. यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून चालणेही अवघड होत असल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी वेश्याव्यवसाय व अवैध व्यवसायाशी संबंधित हालचाली होत असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.

हा परिसर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येत असल्याने येथे नियमित पोलीस गस्त वाढवावी, संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवावे आणि आवश्यक ती कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच, परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्यासह वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेच्या उपाययोजना वाढवाव्यात, असेही स्थानिकांचे मत आहे.

दरम्यान, संबंधित विभागाकडून याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना केल्या जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

See also  राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आ. अण्णा बनसोडे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशनप्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद