पुणे : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर जनसामान्यांसाठी उपचार उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. ते भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) यांच्या ३१ व्या स्थापना दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमास राज्याचे अक्षय ऊर्जा व दुग्धविकास मंत्री अतुल सावे, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, कुलसचिव जी. जयकुमार, आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे आणि डॉ. के. डी. जाधव उपस्थित होते.
यावेळी भारती हॉस्पिटल येथील नूतनीकरण केलेल्या एकत्रित महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्यालय, अत्याधुनिक नेत्ररोग विभाग व नेत्रपेढी तसेच आय. व्ही. एफ. सेंटरचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच विद्यापीठाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले.
गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी विश्वविद्यालयातील ‘इर्षा’ या संशोधन संस्थेला तसेच डॉ. वर्षा पोखरकर, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. रमा भादेकर आणि डॉ. सराह मरियम या संशोधक प्राध्यापकांना ‘एक्सलन्स इन रिसर्च’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच डॉ. संजय गांधी आणि गुंजन सायनी या कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
प्रकाश आबिटकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, दर्जेदार शिक्षणातून गुणवत्ता जपत समाज घडविण्याचे कार्य भारती विद्यापीठामार्फत प्रभावीपणे केले जात आहे.
अतुल सावे यांनी संभाजीनगरच्या झपाट्याने होत असलेल्या विकासाचा उल्लेख करत सांगितले की, येथील उद्योग व्यवसायात सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून मोठ्या प्रमाणावर कुशल व अकुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. त्याचबरोबर आरोग्य व्यवस्थेचीही मोठी आवश्यकता निर्माण होईल. या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठाने संभाजीनगरमध्ये शैक्षणिक तसेच आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी आवाहन केले.
डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले की, भारती विद्यापीठाचे छत्रपती संभाजीनगर येथे लवकरच भव्य शैक्षणिक संकुल उभारण्यात येणार असून पुण्यात आधुनिक क्रीडासंकुल विकसित केले जाणार आहे.
कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी शिक्षणात तंत्रज्ञान हे सहाय्यक साधन असून पर्याय नाही, असे स्पष्ट केले. त्यांनी शिक्षणामध्ये मानवी मूल्ये, नैतिकता आणि संवेदनशीलता जपणे तितकेच आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.
कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी माहिती दिली की, भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) यांनी २०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी शैक्षणिक सहयोग करार केले आहेत. यावर्षी महत्वपूर्ण संशोधन प्रकल्पांसाठी विश्वविद्यालयाला २८ कोटी रुपयांहून अधिक अनुदान नामवंत संस्थांकडून प्राप्त झाले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र उत्तुरकर आणि प्रा. डॉ. ज्योती मंडलिक यांनी केले.
















