बालेवाडी : ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने बालेवाडी येथील SKP कॅम्पस येथे शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेली गायन स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत एकूण 27 गायकांनी सहभाग घेतला असून विविध प्रकारच्या सुरेल सादरीकरणांनी कार्यक्रमाला रंगत आणली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रफुल्ल धामेचा आणि सौ. रेखा धामेचा यांनी प्रभावीपणे केले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अशोकराव मुरकुटे, श्री. गणपतराव बालवाडकर, श्री. राहुलदादा बालवाडकर उपस्थित होते. महासंघाच्या 16 सभासद संस्थांमधून 150 हून अधिक श्रोते या कार्यक्रमाला उपस्थित होते.
स्पर्धेची सुरुवात श्री. दिलीप बोरकर (मुरकुटे गार्डन) यांनी ‘मेरा जूता है जपानी’ या गाण्याने केली. यानंतर गझल, भक्तीगीत आणि लावणी अशा विविध प्रकारच्या गाण्यांचे सादरीकरण झाले. विशेषतः श्री. अब्दुल बेगमपल्ली यांनी सादर केलेल्या विठ्ठलभक्तीगीताने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमात महासंघाशी संलग्न विविध संस्थांच्या प्रमुखांचा सन्मान करण्यात आला. कोहिनूर ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री. लाड, श्री. रमेश नागटिळक व सहकारी, वाकेश्वर पाषाण ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री. हरीश पाठक व सहकारी तसेच बोपोडी ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री. मुरकुटे व सहकारी या मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले: प्रथम क्रमांक सौ. सुजाता विचारे, द्वितीय क्रमांक श्री. सुधीर जोशी, तृतीय क्रमांक श्री. अब्दुल बेगमपल्ली
विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष श्री. सूर्यकांत कलापुरे, सचिव श्री. शरद जाधव, खजिनदार तसेच महासंघाचे अध्यक्ष ऍड. एस. ओ. माशाळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे समारोप संचलन श्री. दिलीप फलटणकर यांनी केले. संगीताच्या सुरांनी नटलेला हा कार्यक्रम उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.
















