पीएमपीएमएल च्या दरवाढीला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा की मताच्या राजकारणासाठी षडयंत्र; पुणे भारतीय जनता पार्टीचे मत काय ? – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची टिका

पुणे : पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अंतर्गत असलेल्या पीएमपीएमएलच्या मार्फत बस सेवा पुरवण्यात येते कमीत कमी पैशांमध्ये सार्वजनिक वाहतूक पुरवणे हा उद्देश आहे परंतु अनेक वेळेस भाडेवाढ करण्यात आली. आता ही दरवाढ दुपटीने करण्यात आली आहे ही बेकायदेशीर, पुणेकरांना त्रास देणारी दरवाढ आहे. याचा पुणे शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत.

अनेक वर्ष पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपाची एक हाती सत्ता आहे भाजपाच्या अनेक नेत्यांनी पुणे शहरातील व पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक कमी दरात देण्याचे आश्वासन दिले. भाजपच्या राजकीय रणनितीप्रमाणे खोटी आश्वासन भाजपाने दिली. त्या खोट्या आश्वासनाला पुणेकर व पिंपरी चिंचवड नागरिक फसले गेले. त्यांना मते दिली व ठरल्याप्रमाणे त्यांनी मत मिळाल्यानंतर आश्वासन पूर्ण केली नाहीत. याची अनेक उदाहरणे आहेत उदाहरणार्थ दस मे बस ही योजना मागील सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपाकडून देण्यात आली होती. निवडणुका जिंकल्या आणि आश्वासनांचा विसर भाजपाला पडला.
भाजप सत्ताधारी असल्याकारणाने पी एम पी एम एल चा वापर राजकारणासाठी करत आहे. आज भाजप पी एम पी एम एल ची भाडेवाढ करत आहे. त्याच्यातले काही नेते जसे भाजपाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर त्याला विरोध करत आहेत. सत्ता तुमची, निर्णय तुमचा, विरोधहि तुमचाच असं होत नाही. संदीप खर्डेकर विरोध करण्यापेक्षा तुमच्या भाजपाचे राष्ट्रीय नेते केंद्रीय राज्यमंत्री ना मुरलीधरजी मोहोळ व महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मतासाठी काय षडयंत्र केले याचा जाब विचारण्याची हिंमत असेल तर विचारा, अन्यथा नोटंकी बंद करा.
पी एम पी एम एल ची भाडेवाढ करण्याची गरज नाही तर त्याच्यामध्ये होत असलेला भ्रष्टाचार थांबवण्याची गरज आहे. हे आपल्या सर्व राष्ट्रीय, राज्यस्तरीय व स्थानिक नेतृत्वाला माहित आहे असे टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.

See also  ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा


पी एम पी एम एल चे स्वतःचे आगार कॉन्ट्रॅक्टर वापरतात व सर्व सुख सुविधाचा वापर मोफत केला जातो. तसेच सी इ आर टी च्या गाड्यांचा गाईडलाईनचा भंग करून कॉन्ट्रॅक्टरच्या जास्तीत जास्त गाड्या चालवल्या जातात व कमीत कमी गाड्या पी एम पी एम एल च्या चालवल्या जातात. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरची व त्यांच्या जवळच्या हितचिंतकांची अधिकाऱ्यांची घर भरली जातात. याची माहिती आपल्या सर्व नेत्यांना आहे. याबाबतची भूमिका भाजपाने स्पष्ट करावी. आपल्या काही चाणक्य नेत्यांची मतांसाठी राजकीय रणनीतीचा भाग म्हणून पी एम पी एम एल त्वरित भाडेवाढ करायची व पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुका घोषित झाल्या की भाडेवाढ कमी करायची व नवनवीन योजना सुरू करण्याची ही रणनीती आहे का याचेही स्पष्टीकरण भाजपाने द्यावे. आता निवडणुका जवळ आल्यामुळे पुणेकरांना व पिंपरी चिंचवड करांना कसे फसवायचे कसे खोटे आश्वासन द्यायचे व निवडणुकीपर्यंत कशा मोठमोठ्या योजना द्यायच्या हा षड्यंत्राचा भाग आहे हे पुणेकर व पिंपरी चिंचवड नागरिक समजतात कारण ही पहिली वेळ नसून असे अनेक वेळा झाले आहे अशी टीका शहर प्रमुख संजय मोरे व शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी केली