बालेवाडीतील कचरा वर्गीकरण शेडला भीषण आग; प्रकल्प हलवण्याची नागरिकांची मागणी

बालेवाडी : बालेवाडी परिसरातील महामार्गालगत असलेल्या कचरा वर्गीकरण शेडमधील कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली. सलग तीन तास हा कचरा जळत असल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून “कचरा वर्गीकरण शेड”च्या नावाखाली येथे मोठ्या प्रमाणात कचरा साठवून ठेवला जात आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कचरा वर्गीकरण शेडमधील कचरा अनेकदा सर्विस रस्त्यावर पसरलेला दिसतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत असून वाहन चालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रारी आणि निवेदने देऊनही प्रशासनाने योग्य कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच ही भीषण आग लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या परिसरात अनेक शैक्षणिक संस्था असून कचरा डेपोच्या मागील बाजूस पुणे महानगरपालिकेचा बस डेपो देखील आहे. आगीमुळे बस डेपोला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच परिसरात मेट्रो, महामार्ग आणि बस डेपो असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी हा कचरा वर्गीकरण प्रकल्प तातडीने अन्यत्र हलवावा, अशी मागणी बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

आग लागण्याची नेमकी कारणे शोधून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच बालेवाडी रेसिडेन्शियल असोसिएशनने सहाय्यक आयुक्त, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय यांना यासंदर्भात निवेदन देऊन संभाव्य धोक्याबाबत इशारा दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आज ही गंभीर घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

See also  साईचौक ते मधुबन बालेवाडी या रस्त्यावरच मांस टाकले जात असल्याने नागरिक त्रस्त