पुणे : स्वतःच्या मुलाचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्यानंतरही त्या दुःखावर मात करून सुरेश सकपाळ यांच्या सुजय प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेली समाजसेवा प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रमाणेच समाजातील सेवाभाव जपण्याची आज नितांत गरज आहे. पैसा आणि पद नसतानाही सामाजिक कार्य करता येते, याची प्रेरणा सुरेश सकपाळ यांच्या कार्यातून प्रत्येकाने घ्यावी, असे मत निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी व्यक्त केले.
सुजय प्रतिष्ठान आणि मैत्री रक्ताची यांच्या वतीने सुजय सकपाळ यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त मोफत आयुर्वेदिक तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विठ्ठल जाधव बोलत होते.
यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अप्पर आयुक्त शिवकुमार साळुंखे(आई.आर.एस), महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम, उद्योजक किसन भोसले,विद्याताई जाधव, कस्टम अधिकारी स्नेहल खैरे, अप्पर राज्यकर आयुक्त उमाकांत बिराजदार, सुधीर सकपाळ, उमेश सकपाळ,सुजय प्रतिष्ठानचे प्रमुख सुरेश सकपाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सुजय प्रतिष्ठान तर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ११७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.तसेच समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी ‘सेवा रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये उद्योजक किसन भोसले, उमाकांत बिराजदार, सागर घोरपडे, शैलेश पालकर, विठ्ठल जाधव आणि उषा म्हात्रे यांचा समावेश होता.
तसेच संतोष जाधव, डॉ. सुरेश राठोड, हरिभाऊ शिवले, मधुकर चौधरी, उज्ज्वला गौड, किरण सावंत, विजय ठुबे, श्याम झवर यांच्यासह श्री काळभैरवनाथ फाउंडेशन, होय हिंदू आणि आदर्श सेवा मंडळ या संस्थांना ‘समाज गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
विठ्ठल जाधव म्हणाले, “सुरेश सकपाळ यांनी समाजकार्याला वाहून घेतले आहे. त्यांचा मुलगा सुजय सकपाळ याचे कर्करोगामुळे निधन झाले. मात्र, समाजातील इतर कोणालाही आपल्या कुटुंबाप्रमाणे दुःख भोगावे लागू नये, तसेच गरजू रुग्णांना कायमस्वरूपी रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने त्यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे कार्य निरंतर सुरू ठेवले आहे. स्वतःच्या दुःखाचे समाजसेवेत रूपांतर करणे ही मोठी प्रेरणादायी बाब आहे.”
मेघराज राजेभोसले म्हणाले, “स्वतःच्या मुलाच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून सुरेश सकपाळ समाजासाठी काम करत आहेत, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. त्यांनी समाजालाच आपले कुटुंब मानले आहे. या भावनेतून सुरू असलेली समाजसेवा हीच सुजयला खरी श्रद्धांजली ठरेल.”
रामदास माने म्हणाले, “‘जैसे निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेथे मिळेल फळ’ या तुकाराम महाराजांच्या विचारांप्रमाणे सुरेश सकपाळ यांची वाटचाल सुरू आहे. ते ज्या प्रकारचे समाजकार्य करत आहेत, ते प्रामुख्याने शासनाचे काम आहे. मात्र, शासनाची वाट न पाहता स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचा त्यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच सर्वांसाठी आदर्श आहे.”यावेळी आयुरनिर्माण हेल्थ फाउंडेशन आणि एसएलएस वेलनेस यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर तसेच मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. तसेच उपस्थित नागरिकांची आयुर्वेदिक पद्धतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर भंडारी यांनी केले, तर सुरेश सकपाळ यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी आयुरनिर्माण हेल्थ फाउंडेशन आणि एसएलएस वेलनेस यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर तसेच मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. तसेच उपस्थित नागरिकांची आयुर्वेदिक पद्धतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर भंडारी यांनी केले, तर सुरेश सकपाळ यांनी प्रास्ताविक केले.















