समाविष्ट २३ गावांच्या विकास आराखड्यावर महापालिका आयुक्तांसोबत नगरसेविका सपना छाजेड यांची चर्चा

पुणे : पुणे शहराच्या भविष्यातील नियोजनबद्ध विस्ताराच्या दृष्टीने नगरसेविका तथा शहर सुधारणा समितीच्या उपाध्यक्षा सौ. सपना आनंद छाजेड यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या विकास आराखड्याबाबत (DP Plan) तसेच पुढील विकासाच्या रोडमॅप संदर्भात सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत नव्याने समाविष्ट गावांचा नियोजित, सर्वसमावेशक व शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. तसेच बांधकाम परवानग्या, मूलभूत नागरी सुविधा, भविष्यातील शहरीकरण, रस्ते विकास, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा, उद्याने, आरोग्य व शैक्षणिक सुविधा आदी विषयांवर सखोल विचारविनिमय करण्यात आला.

नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन विकास प्रक्रियेत पारदर्शकता, सुसूत्रता आणि दीर्घकालीन नियोजन आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. समाविष्ट गावांमध्ये नियोजनबद्ध विकास होण्यासाठी स्पष्ट धोरण आखून त्यानुसार टप्प्याटप्प्याने कामे राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आली.तसेच शहर सुधारणा समितीमार्फत प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेणे, नागरिकांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यानुसार कृती आराखडा तयार करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.

समाविष्ट २३ गावांचा सर्वांगीण विकास, सक्षम पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध शहरीकरण हेच प्रमुख उद्दिष्ट असून, त्या दृष्टीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर तसेच अतिरिक्त आयुक्त श्री. ओमप्रकाश दिवटे हे देखील उपस्थित होते.

See also  शिक्षकांमध्ये जग बदलण्याची ताकद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण