पुणे : केंद्रीय जलशक्ती मंत्री मा. श्री. सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे येथे जलसंधारण, नदी, जलाशय व धरण व्यवस्थापन तसेच जलविषयक विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या दौऱ्यादरम्यान केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ, पुणे महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे, पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर, उपआयुक्त (विद्युत विभाग) श्रीमती मनीषा शेकटकर तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खडकवासला येथील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र (CWPRS) येथे आयोजित National Conference on Integrated River, Reservoir and Dam Systems या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री. सी. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नदी, जलाशय आणि धरण व्यवस्थापनाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
तसेच जल संचय जन भागीदारी उपक्रमाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेण्यात आला. त्यानंतर CWPRS येथे आयोजित तंत्रज्ञान व नवोपक्रम प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जलक्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांची माहिती सादर करण्यात आली.
यानंतर राष्ट्रीय जल अकादमी, खडकवासला येथे अंडरपासचे उद्घाटन, वृक्षारोपण तसेच केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम पार पडला.
दरम्यान, केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री. सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली PARMM प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, कामकाजातील प्रगती आणि संबंधित विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, पुणे महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे, पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर, उपआयुक्त (विद्युत विभाग) श्रीमती मनीषा शेकटकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या दौऱ्यादरम्यान पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत सिंहगड परिसरातील पुणे महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची (STP Plant) पाहणी करण्यात आली. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री. सी. आर. पाटील, केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर तसेच पुणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या पाहणीदरम्यान प्रकल्पाच्या कामकाजाची माहिती घेण्यात आली.
या संपूर्ण दौऱ्याच्या माध्यमातून जलसंधारण, जलव्यवस्थापन, नदी व धरण प्रणाली, आधुनिक तंत्रज्ञान आणि सांडपाणी प्रक्रिया यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा व आढावा घेण्यात आला.
















