बाणेर-: बाणेर – बालेवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी नागरिकांनी महावितरणच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून आंदोलनही केले होते. या पार्श्वभूमीवर नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
बैठकीनंतर बालेवाडी सर्व्हे नंबर ४ येथे प्रस्तावित नवीन सबस्टेशनसाठी राखीव जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. सध्या बाणेर-बालेवाडी भागाला NCL EHV केंद्रातून दररोज सुमारे १५० मेगावॅट तर सुस-म्हाळुंगे परिसराला हिंजवडी EHV केंद्रातून सुमारे ७५ मेगावॅट वीजपुरवठा केला जात आहे. मात्र आयटी हब म्हणून झपाट्याने विस्तारत असलेल्या या भागासाठी सध्याचा पुरवठा अपुरा पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमोलभैय्या बालवडकर यांनी सांगितले की, नवीन सबस्टेशन उभारण्यासाठीची मोकळी गायरान जागा त्यांनी २०१९-२०२० मध्येच महापारेषण आणि महावितरणला सुचवली होती. मात्र प्रशासनाचा विलंब आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे प्रकल्प रखडल्याचा आरोप त्यांनी केला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही हे सबस्टेशन सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात कोणतीही प्रगती झालेली नाही.
या सबस्टेशनसाठी अंदाजे ३० ते ४० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून महापारेषणने २०२७-२८ मध्ये निधी उपलब्ध करण्याची तरतूद केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यासाठी आणखी ३ ते ४ वर्षे लागू शकतात. परिणामी बाणेर-बालेवाडीकरांना पुढील ५ ते ७ वर्षे अनियमित वीज पुरवठ्याचा त्रास सहन करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रस्तावित सबस्टेशनच्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून डेब्रीस आणि राडारोड्याचे मोठे ढिगारे साचलेले आहेत. महापारेषणने हा राडारोडा हटविण्याची प्रक्रिया सुरू केली असून लवकरच जागा मोकळी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
“हे सबस्टेशन लवकरात लवकर सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री Sunetra Pawar यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार,” असे अमोलभैय्या बालवडकर यांनी सांगितले.
हे सबस्टेशन पूर्ण झाल्यानंतर बाणेर-बालेवाडी भागाला अतिरिक्त १५० मेगावॅट वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पाहणी व बैठकीवेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. कर्पे, उपअभियंता श्री. पठाडे आणि श्री. मोमीन उपस्थित होते.
















