गणेशखिंड रस्त्यावरील रेंगाळलेल्या फुटपाथच्या कामावरून आमदार सिद्धार्थ शिरोळे कडक भूमिकेत

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील फुटपाथच्या रेंगाळलेल्या कामामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल घेत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि कंत्राटदाराची दिरंगाई पाहून त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा फुटपाथ तात्काळ बुजवून पूर्ववत करण्याचे कडक निर्देश दिले.

गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी रोड डिपार्टमेंटकडून गणेशखिंड रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे फुटपाथ ड्रेनेज आणि स्टॉर्म वॉटर लाईन  टाकण्यासाठी खोदून ठेवण्यात आले होते. मात्र, महिना-दीड महिना उलटून गेला तरी प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. फुटपाथ पूर्णपणे उकरून ठेवल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मॉर्निंग वॉक करणे किंवा चालणे अशक्य झाले आहे, तसेच परिसरातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही ये-जा करताना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

या समस्येची माहिती मिळताच आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी तातडीने रोड डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारासह गणेशखिंड रस्त्याला भेट दिली. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना जाब विचारताना सुनावले की,”जर तुमच्याकडे कामाचा कोणताही ठोस नियोजन  तयार नव्हता, तर मग ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हा महत्त्वाचा फुटपाथ खोदून का ठेवला? कामाचे नियोजन शून्य असताना नागरिकांना वेठीस धरणे खपवून घेतले जाणार नाही.”
सध्या पावसाळा सुरू होत असल्याने हा रस्ता असाच राहिल्यास परिस्थिती अधिक बिकट होईल, ही बाब ओळखून आमदार शिरोळे यांनी स्पष्ट आदेश दिले की, जोपर्यंत कामाचे पुढील नियोजन किंवा मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत हा खोदलेला भाग तात्काळ माती-मुरुम टाकून बुजवण्यात यावा. तसेच, नागरिकांना चालण्यासाठी हा फुटपाथ तातडीने पहिल्यासारखा करून देण्यात यावा.

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्याचे आश्वासन दिले असून, गणेशखिंड परिसरातील नागरिकांनी या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

See also  प्रगत तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन अधिक सुखकर होईल - अजय देशपांडे