“रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पब, बार व हॅाटेल चालकांवर कारवाई करा”- लहू बालवडकर

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे एका भरधाव कारने तरुण-तरुणीला चिरडल्याने अपघात झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.  या अपघातात दोन्ही अभियंत्यांचा मृत्यू झाल्याची अतिशय दुर्दैवी  घटना घडली आहे . यातच पुणे हे विद्‌येचे माहेर समजलं जातं.  मात्र घडलेली घटना सर्व पुणेकरांची मान शरमेने खाली झुकवणारी अशी प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराच्या संस्कृतिला धक्का लागणारे प्रकार सातत्याने समोर येत असून याला नाईट लाईफ संस्कृती कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. म‌द्यसेवन केलेली अनेक तरुण-तरुणी मध्यरात्रीच्या सुमारास आपली वाहने सुसाट वेगाने चालवत आहेत. यातूनच अशा दुर्दैवी घटनांना आपणाला सामोरे जावे लागत आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. असं म्हणत भाजपचे चिटणीस लहु बालवडकर यांनी यासंदर्भात उपाययोजना करण्यात याव्यात, याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी यांना निवेदन दिले.

मद्यधुंद चालकांच्यामुळे औंध,बाणेर,बालेवाडी या परिसरात देखील अनेक पब, बिअरबार असून या भागात देखील नागरिकांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी आपल्या भागात म्हणजेच बाणेर बालेवाडी औंध येथे सुरु असलेली नाईट लाईफ संस्कृती थोपविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पब, बार व हॅाटेल चालक यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच मध्यरात्री शहरातील अनेक चौकाचौकात तरुण तरुणी गर्दी करुन हुल्लडबाजी करत असतात. त्यावर चाप बसविण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणे गरजेचे आहे. अशी मागणी देखील लहू बालवडकर यांनी केली आहे.


तसेच औंध बाणेर बालेवाडी या परिसरातील पब हे रात्री ८ वाजेनंतर सुरु होतात व पहाटे पर्यत चालु असतात. त्यानंतर अनेक तरुण-तरुणी पार्टीच्या नावाखाली नशेत हुल्लडबाजी करत असतात. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पब,बार व हॅाटेल चालकांना वेळेचे बंधन घालावे. तसेच रात्री बेदारकारपणे गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
  
आपल्या भागात सुरु असलेल्या नाईट लाईफमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा देखील मुद्दा आहे. नाईट लाईफमुळे तरुण तरुणी नशेच्या अमलाखाली गेल्याने, त्यांना कसलेही भान राहत नाही. त्यामुळे अनेकवेळा तरुण-तरुणी रस्त्यावरच अश्लील चाळे करताना, नाचताना, धिंगाणा घालताना व वेड्यावाकड्या गाड्या चालवताना दिसतात, याकडे देखील गंभीयाने पाहणे आवश्यक आहे. सोबतच या अपघात प्रकरणातील आरोपी असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करून मृतांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा. अशीही विनंती देखील लहू बालवडकर यांनी केली आहे.

दरम्यान, लहू बालवडकर यांनी यासंदर्भात निवेदन दिल्यानंतर पोलीस निरीक्षक यांनी देखील त्यावर तातडीने उपाययोजना तसेच कठोर कारवाई  केली जाईल, असं आश्वासन लहू बालवडकर यांना देण्यात आलं आहे.

See also  गरीबाचा मुलगा आय.ए.एस. होऊ शकतो परंतु प्राध्यापक नाही!