पुणे ::सातारा-सोलापूर मार्गावरील तांदूळवाडी येथे रस्त्यालगत असलेल्या विहिरीत वाहन कोसळून आठ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, अशा घटना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर धानोरी, पुणे येथील भारत माता रोड, मार्थोपोलिस शाळेजवळ रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरीवर तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अमित म्हस्के यांनी केली आहे.
सदर विहीर वाहनचालकांना सहज दिसत नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी त्वरित मजबूत सुरक्षा कठडा, चेतावणी फलक, रिफ्लेक्टर व प्रकाशव्यवस्था उभारण्यात यावी.तसेच, पुणे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित यंत्रणांनी पुणे शहरातील रस्त्यालगत असलेल्या सर्व धोकादायक विहिरींचे विशेष सर्वेक्षण करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
“तांदूळवाडीसारखी दुर्घटना पुण्यात घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे,” असे अमित म्हस्के यांनी म्हटले आहे.
















