पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयात अभ्यास करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा विद्यापीठ परिसरात अतिशय उत्साहात पार पडला. ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विद्यापीठाच्या अभ्यासपरंपरेला आणि जयकर संस्कृतीला उजाळा देण्यासाठी आयोजित या मेळाव्यास विद्यार्थी, अधिकारी, उद्योजक, वकील, सामाजिक अणि राजकीय क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे यूपीएससी उत्तीर्ण व अनेकांचे आदर्श असलेले बाळासाहेब नागवे, सह आयुक्त आयकर विभाग मुंबई, हे कार्यक्रमाचे अध्यक्षांनी व प्रमुख पाहुणे म्हणून मिनी जयकर ग्रंथालय येथे अभ्यास केलेले श्री. विक्रम कदम सहायक पोलीस आयुक्त,नवी मुंबई,श्री.विजय चव्हाण वरीष्ठ पोलीस,पुणे,श्री.सचिन खोमणे, स्वीय सहायक(PA)मंत्रालय मुंबई, श्री. नितीन कोळेकर अधीक्षक उद्योग संचालन मुंबई, आणि जयकर मित्र परिवारातील महाराष्ट्रात विविध खात्यांत कार्यरत असलेले अधिकारी उपस्थित होते. तसेच नामांकित उद्योजक, वकील, सामाजिक अणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मेळाव्यास उपस्थित होते.
विद्यापीठातील मुख्य जयकर ग्रंथालयासोबतच रात्री अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘मिनी जयकर’ किंवा ‘हनुमान जयकर’चे महत्त्व आणि त्या ठिकाणी घडलेली विद्यार्थी संस्कृती यांची भावनिक आठवण सर्वांनी व्यक्त केली. साध्या टेबल-खुर्च्या, अल्प साधनांनी सज्ज, पण जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अनेक अधिकारी घडवणाऱ्या या ठिकाणाची विद्यार्थ्यांनी आठवण काढत गेल्या अनेक वर्षांचा संघर्षमय प्रवास सांगितला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील कष्ट, आर्थिक अडचणी आणि ४ ते १० वर्षे अखंड अभ्यास करून साध्य केलेले यश याबद्दल अनुभव मांडले. विद्यापीठातील ५४ विषयांमधून घडलेले अधिकारी, तसेच समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे विद्यमान आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेहसंमेलनानंतर मुख्य इमारतीचा विशेष गाईडेड टूर घेण्यात आला. विद्यापीठाच्या ४१६ एकर परिसरातील मुख्य इमारतीखाली असलेला भुयारी मार्ग पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले. हा मार्ग पूर्वी मुंबई प्रांताच्या गव्हर्नरांच्या वास्तव्यात त्यांच्या भोजनासाठी वापरला जात असे, अशी माहिती देण्यात आली. सागवानी लाकडाचे कोरीवकाम, झुंबर आणि इमारतीची वैभवशाली रचना पाहून उपस्थितांचा इतिहासाच्या दालनाशी नवा परिचय झाला.
या मेळाव्यास एकूण १३० हून अधिक अधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासकीय सेवा, पोलीस विभाग, महसूल, सहकार, शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी एकत्र येऊन विद्यापीठात घालवलेल्या संघर्षमय दिवसांच्या आठवणी जागवल्या.
“विद्यापीठातील संघर्षाच्या दिवसांची आठवण आज पुन्हा जागी झाली. परिस्थितीवर मात करून अधिकारी झालेले सर्व सहअभ्यासक एका ठिकाणी भेटल्यामुळे मन भारावले. आजचा दिवस सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला,” असे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना सर्वांनी सांगितले.
स्नेह मेळावा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भास्कर घोडके यांनी केले, प्रास्ताविक श्री. कृष्णा कुडुक यांनी केले, समारोप आभार प्रदर्शन वसंत पवार यांनी केले. आयोजक कृष्णा कुडूक,भास्कर घोडके, वसंत पवार, बसवंत गजलवार, दिनेश साबळे, महादेव कुळाल व इतर माजी विद्यार्थी यांनी केले. हेरीटेज वॉक/वारसा सहल ची माहिती इतिहास विभागचे पीएच डी विद्यार्थी संशोधक विद्यार्थी तुकाराम शिंदे यांनी दिली.
























