पुणे : म्हाळुंगे येथील किर्ती एलिगंट सोसायटीच्या दक्षिण बाजूस मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे कचरा, राडारोडा तसेच बांधकामातील मलबा टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात माती, भूजल, विहिरी, बोअरवेल आणि हवेचे प्रदूषण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या कचऱ्यातील घातक पदार्थ पावसाच्या पाण्यासोबत जमिनीत झिरपत असल्याने परिसरातील भूजल दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच परिसरातील खुली विहीर आणि बोअरवेल दूषित होण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
याशिवाय, मोठ्या प्रमाणावर टाकण्यात आलेल्या मलब्यामुळे जमिनीची नैसर्गिक पातळी (टोपोग्राफी) बदलली असून पावसाचे तसेच सांडपाणी किर्ती एलिगंटच्या आवारात साचत आहे. त्यामुळे सोसायटीच्या संरक्षण भिंतीवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला असून भविष्यात भिंत कोसळण्याचा धोका असल्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून बेकायदेशीरपणे कचरा व मलबा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, परिसरातील कचरा त्वरित हटवावा आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे.
पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा गंभीर विषय असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
घर ताज्या बातम्या किर्ती एलिगंटच्या दक्षिण बाजूस बेकायदेशीरपणे कचरा, बांधकामाचा राडारोडा ; रहिवाशांच्या आरोग्य व...
















