पुणे, प्रतिनिधी : पासपोर्टशी संबंधित तक्रारींचे त्वरित निवारण करून नागरिकांना वेळेत पासपोर्ट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्या वतीने बुधवारी (८ जुलै) बाणेर येथील कार्यालयात ‘जनसंवाद सत्र’ आयोजित करण्यात आले. या उपक्रमाला १०० हून अधिक पासपोर्ट अर्जदारांनी प्रतिसाद दिला.
‘नागरिको देवो भव:’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सत्रात प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोदकुमार गायकवाड यांनी अर्जदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक प्रलंबित प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला.
यावेळी अर्जदारांना पासपोर्ट अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, न्यायालयीन प्रकरणांमध्ये अवलंबायची प्रक्रिया, पत्त्यातील बदल, तसेच इतर तांत्रिक बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या ‘जनसंवाद सत्रा’मुळे नागरिकांना पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यामुळे पासपोर्ट प्रक्रियेतील विलंब कमी होण्यास मदत झाली असून सेवा अधिक पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले.
प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांनी नागरिक-केंद्रित सेवा अधिक प्रभावीपणे देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला असून, पुढील ‘जनसंवाद सत्र’ ५ ऑगस्ट २०२६ (बुधवार) रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत बाणेर येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.















