पुणे : केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र. ९ मध्ये ‘खासदार सेवा आपल्या दारी’ या नागरी समस्या निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध नागरी समस्यांचे स्वीकार, संबंधित विभागांशी समन्वय साधून त्यांचे निराकरण, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शिबिराचे आयोजन शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत बाणेर गाव येथील श्रीराम मंदिर येथे, तसेच त्याच दिवशी सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत पाषाण गावातील श्री गणेश मंदिर, कोकाटे आळी येथे होणार आहे. तसेच रविवार, १२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत बालेवाडी गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे तिसरे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांना आयुष्मान भारत (ABHA) कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, रेशन कार्डसंदर्भातील सेवा, महिला व बालकल्याण विभागाच्या योजना, संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजना, दिव्यांग पेन्शन, दिव्यांगांसाठी PMPML मोफत बस पास, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे ई-केवायसी, महावितरणशी संबंधित प्रश्न, पुणे महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती, दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांसाठीच्या योजना तसेच पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, रस्ते, वीज आदी नागरी समस्यांबाबत तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व प्रकारची निवेदनेही स्वीकारली जाणार आहेत.
शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी आधार कार्डची झेरॉक्स प्रत तसेच आवश्यकतेनुसार संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कोथरूड मतदारसंघ उत्तर विभागाचे अध्यक्ष सचिन पाषाणकर यांनी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या समस्या मांडाव्यात आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून घ्यावा, असे आवाहन केले आहे.













