बालवडकर परिवाराची वारकरी सेवेची ३२ वर्षांची परंपरा कायम; ९५० भाविकांसाठी मोफत पंढरपूर यात्रा

बालेवाडी : आषाढी एकादशीनिमित्त बालेवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ९५० वारकरी भाविकांसाठी मोफत पंढरपूर यात्रेचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय बालवडकर, नगरसेवक अमोल बालवडकर आणि राहुल बालवडकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेला यंदा ३२ वर्षे पूर्ण झाली.

यावेळी १९ बसमधून भाविक पंढरपूरकडे रवाना झाले. “जय हरी विठ्ठल” आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला. नामस्मरण, अभंग आणि विठ्ठलभक्तीच्या वातावरणात वारकऱ्यांनी यात्रेला प्रारंभ केला.

यावेळी अमोल बालवडकर म्हणाले, “गेली ३२ वर्षे वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. समस्त वारकरी मायबापांचे आशीर्वाद हीच आमची खरी संपत्ती असून, सांप्रदायिक आणि आध्यात्मिक परंपरेची सेवा करण्याचे समाधान या उपक्रमातून मिळत आहे.”

यात्रेच्या स्थायी समिती सदस्य अमोल बालवडकर, शुभारंभप्रसंगी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय बालवडकर, राहुलदादा बालवडकर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वरभाऊ तापकीर, सुनील चांदेरे, प्रकाश बालवडकर, अनिल बालवडकर, वैशाली कमाजदार, कल्याणी टोकेकर, महिला भजनी मंडळाच्या सदस्यांसह मोठ्या संख्येने वारकरी भाविक उपस्थित होते.

गेली तीन दशके अखंडपणे सुरू असलेला हा उपक्रम बालेवाडी परिसरातील वारकरी सेवेची जपलेली परंपरा आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा ठरत आहे.

See also  कृषीमंत्री कोकाटे  मंत्रीपदावरून हाकलून द्या - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुण्यात आंदोलन